पेठ तालुक्यातील शिक्षकांनी दिली अद्यावत रुग्णवाहिका, १५ लाख किंमत

शनिवार, 5 जून 2021 (08:28 IST)
ज्ञानदानासोबत संकटकाळात आपल्याच समाजाच्या मदतीसाठी स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन कोरोनाच्या महामारीत जनतेच्या आरोग्य सुविधेसाठी पेठ तालुक्यातील शिक्षकांनी तब्बल १५ लाखांचा एकत्रित निधी उभा करून आरोग्य विभागास सुसज्ज सर्व सोयीयुक्त रुग्णवाहिकेचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते लोकापर्ण करण्यात आले आहे.
 
पेठ तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाची झालेली धावपळ पाहून, पेठ तालुक्यातील शिक्षकांनी प्रत्येकी दोन हजार रूपयांची वर्गणी एकत्र करून १५ लाखांचा कोविड निधी एक महिन्यात उभा केला आहे. पेठ तालुक्यातील वाडी वस्तीवरील सामान्य जनतेला तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी सर्व उपचाराच्या सुविधा असलेली रूग्णवाहिका खरेदी करून आरोग्य विभागाच्या स्वाधीन केली. या रुग्णवाहिकेमुळे कोरोना कालावधीसह कायमस्वरूपी सदरची रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी सदैव उपलब्ध असणार आहे.
 
पेठ सारख्या छोट्या व दुर्गम तालुक्यातील शिक्षकांनी १५ लाखांचा कोविड निधी जमा करून रुग्णवाहिका भेट दिल्याने जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करून शिक्षक समन्वय समितीचा गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, वैशाली वीर, नम्रता जगताप, सरोज जगताप, डॉ. योगेश मोरेआदी उपस्थित होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती