अकोल्यात शिक्षकांनी उभारले ६० ऑक्सिजन बेडचे सुसज्ज कोविड सेंटर

रविवार, 2 मे 2021 (08:30 IST)
अहमदनगर जिल्हयातील अकोले तालुका शिक्षक समन्वय समितीच्या सहकार्याने उभारलेले ६० बेडचे ऑक्सिजन कोविड सेंटर महाराष्ट्र दिनी रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहे. दुर्गम भाग आणि आदिवासी तालुका अशी अकोल्याची राज्यात ओळख आहे. आता या कोरोना महामारीने अनेक कुटुंबांना विषाणूने विळखा घातला. अनेक लोक बाधित झाले. पेशंट आणि नातेवाईकांचे प्रचंड हाल झाले. अकोल्यात ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत. तसेच उपलब्ध बेड पेशंट संख्येच्या तुलनेत अत्यंत नगण्य आहेत. म्हणजे पेशंट ८०० असतील तर एकूण बेड अवघे ७० होते. अशा परिस्थितीत संगमनेर आणि नाशिकला बेड मिळत नव्हते. आजही हा त्रास सुरू आहे. हे हृदयद्रावक चित्र बघून अस्वस्थ झालेल्या अकोल्यात संवेदनशील मनाच्या प्राथमिक शिक्षकांनी निधी जमवायला पुढाकार घेतला. दोन तीन दिवसांत दोन अडीच लाख रुपये निधी उभा राहिला. या कामाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळेल असे  कोणाला वाटले ध्यानीमनी नव्हते. आधी माध्यमिक शिक्षक आणि नंतर महाविद्यालयातले प्राध्यापक सोबत आले आहेत, आणखी येत आहेत.  आणखी दानशूर व्यक्ती पुढे येत आहेत. आता कोविड सेंटर उभारायचे कामदेखील पूर्ण झाले आहे.
 
एकीकडे मदतनिधी उभा केला जात असताना सातत्याने वाढ होत आहे. ६० ऑक्सिजन बेडसाठी अवघ्या तीन दिवसांत सगळं पाईपिंग पूर्ण झालं आहे. त्यासाठी साहित्य उपलब्ध होणे कठीण असताना मोजक्या शिक्षकांनी जीव धोक्यात घालून ते मिळवले. रस्त्यावर उभ्या उभ्या चार पाच लाख पेमेंट केले. उद्योजक मित्र नितीन गोडसे यांनी पुढाकार घेत सहकार्य केले. काही शिक्षकांनी अत्यंत मेहनत घेतल्यामुळेच बऱ्याच गोष्टी सुकर झाल्या.
सलाईन स्टँडपासून मास्क, सॅनीटायझर सगळं सर्जिकल साहित्य शिक्षकांनी स्वतः नाशिकला जाऊन आणले.
 
        सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शिक्षक तिकडे सेंटरला थांबून असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ‘एक नाम केशव‘ असा मंत्र जणू सेंटर उभारण्यासाठी सरसावलेले कार्यकर्ते शिक्षक जपत आहेत. तोदेखील सध्याच्या गंभीर परिस्थितीत.  सामान उतरावयाला हमाल काही मिळेना तेव्हा गाडीमधून खाटा आणि गाद्या शिक्षकांनी उतरवल्या. तेथे उपस्थित काही पत्रकार मित्र देखील मदतीला धावून आले.
 
      सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजन मिळणे कठीण आहे. तो मिळवण्यासाठी शिक्षकांनी काही मंत्री, आमदार, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांची आवश्यक तेथे मदत घेतली. सुगाव खुर्द येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हा सगळा सेटअप रेडी झाला की आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पुढील काम बघत आहेत. प्राथमिक शिक्षकांनी नऊ लाख ७० हजार रुपये निधी  अखेर जमवला. माध्यमिक शिक्षक संघटनेने यात सहभागी होत साडेसात लाख रुपये निधी जमवला. महाविद्यालयातील शिक्षक यात सहभागी झाले आहेत.

फोटो: सांकेतिक

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती