लग्नाला निघालेले वऱ्हाड पोहोचले पोलीस ठाण्यात,

बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (21:43 IST)
अकोला कोरोनाचा धोका वाढत असल्याने, लग्न समारंभांवर कडक निर्बंध आणले जात आहेत. मात्र अशातही  हिंगोली येथून निघालेल्या लग्नाच्या वऱ्हाडाला लग्नमंडपात न जाता थेट पातूर पोलिसात जावे लागले. यावेळी पोलिसांनी कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तीन चालकांविरोधात गुन्हा दाखल केला.
 
रविवारी अकोला जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी लागू केली होती. मात्र अशातही हिंगोली येथून पातूर येथे वऱ्हाडाचे तीन टेम्पो भरून आले होते. ही बाब जेव्हा पोलिसांच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी वऱ्हाडी मंडळींना थेट पोलीस ठाण्यातच बोलावून घेतले. याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, ‘हिंगोली येथून तीन वाहने तालुक्यातील शिर्ला येथे लग्नासाठी तब्बल ३९ वऱ्हाडी घेऊन निघाले होते. यामध्ये नवरदेवाचाही समावेश होता. तीनही वाहनांना थाबंवित विचारणा केली असता, हा संपूर्ण प्रकार समोर आली. यावेळी पोलिसांनी तीन्ही वाहनांवर कारवाई करीत वाहने पोलीस ठाण्यात जमा केले होते.
 
दरम्यान, लग्न हा महत्त्वाचा भाग म्हणून नवरदेव व ३९ वऱ्हाडींना सोडून देण्यात आले. मात्र वाहन (एमएच ३८ एल २४९६) चे चालक यादव कानोजी फाळके (रा. जयपूर, हिंगोली), वाहन (एमएच ३८, ७०५०) चे चालक रतन मोतीराम वैराट (रा. खंडाळा, हिंगोली) आणि वाहन (एमएच ३८ एक्स १९३०) चे चालक पांडूरंग भिकातजी गाडे ( रा. जयपूर, जि. हिंगोली) या तीनही चालकांविरूद्ध कलम १८८, २६९ नुसार कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती