तोपर्यत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र प्रदेश केंद्रशासित करा : उद्धव ठाकरे

सोमवार, 26 डिसेंबर 2022 (15:30 IST)
कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र प्रदेश केंद्र शासीत करण्याचा ठराव करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेत केली. ते म्हणाले, सीमावादावर कर्नाटक ठोस भूमिका मांडत आहे. एक इंचही जागा महाराष्ट्राला देणार नाही, असा ठराव कर्नाटक सरकारने मंजूर केला. हा प्रस्ताव खुद्द कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मांडला. मात्र आपले मुख्यमंत्री याविषयी ब्र पण काढत नाहीत. ते आज सभागृहातही उपस्थितीत नाहीत. ते दिल्लीला गेले आहेत. कधी परत येतील माहित नाही.

ते विमानात असताना पुन्हा त्यांना माघारी बोलावले तर, त्यामुळे कर्नाटक सीमेवर नेमका काय ठराव येणार आहे. त्याचा काही लेखी प्रस्ताव सादर केलेला आहे का, असे अनेक प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
 
पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, कर्नाटक सीमा भागातील मराठी नागरिकांना न्याय द्यायचा असेल तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र प्रदेशचा ताबा केंद्र शासनाने घ्यावा, असा ठराव महाराष्ट्राने सरकारने करायला हवा. सीमा भागातील मराठी माणसांवर होणारे अत्याचार थांबवावेत, असा ठराव आपण करायला हवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
 
सीमा वादासाठी कारागृहात गेलो असे म्हणणारे आता सीमापार करुन तिकडे गेले आहेत. त्यांची भूमिका बदलली आहे, असा टोलाही उद्धव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता मारला. कर्नाटक मधील एकही नेता म्हणत नाही की महाराष्ट्रात जन्म घ्यावा. मात्र आपले नेते कर्नाटकात जन्म घ्यावा, असे म्हणतात असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केला. कर्नाटकवर प्रेम करणाऱ्यांकडून सीमा वादाची काय अपेक्षा करणार असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती