मनमाडमध्ये अभूतपूर्व तणाव! कांदे-ठाकरे दौऱ्यामुळे संपूर्ण शहराला पोलिस छावणीचे स्वरुप

शुक्रवार, 22 जुलै 2022 (15:40 IST)
रेल्वेचे जंक्शन अशी ओळख असलेले मनमाड आज अभूतपूर्व तणावामध्ये आहे. निमित्त आहे ते युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याचे. विशेष म्हणजे, राज्यात सत्तापालटाचे जे महाकाय नाट्य गाजले त्यात सहभागी असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे हे सुद्धा याच भागाचे प्रतिनिधीत्व करतात. आणि आज कांदे हे हजारो समर्थकांसह ठाकरे यांना मनमाड दौऱ्यात भेटणार आहेत. त्यामुळे शेकडो पोलिसांचा ताफा मनमाडमध्ये दाखल झाला आहे. परिणामी, प्रथमच मनमाड शहराला पोलिस छावणीचे रुप आले आहे.
 
कांदे हे शिवसेनेतून बंडखोरी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. दिवसेंदिवस शिवसेनेचे अनेक नेते शिंदे गटात जात आहेत. याची दखल घेत आदित्य ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा सुरू झाला आहे. नव्याने पक्षबांधणी करणे आणि सेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी त्यांचा हा दौरा आहे. ठाकरे हे कांदेंच्या मतदारसंघात येत आहेत. त्याची दखल घेत कांदे यांनी ठाकरे यांना भेटण्याचे जाहीर केले आहे. हजारो समर्थकांच्या साक्षीने भेट घेऊन निवेदन देण्याचे कांदे यांनी म्हटले आहे.
 
मात्र, ही भेट होऊ नये यासाठी पोलिसांनी कसोशीचे प्रयत्न सुरू केले आहेत. कांदे यांना भेटीची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. कांदे आणि ठाकरे समर्थकांमध्ये वादावादी आणि भांडण होऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधिक्षकांसह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि शेकडो पोलिसांचा ताफा मनमाडमध्ये सध्या आहे. जागोजागी, चौकाचौकात पोलिस बंदोबस्त असून कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. श्वान पथक, दंगा नियंत्रण पथकासह सर्व यंत्रमा दिमतीला ठेवण्यात आली आहे. त्यामुळे मनमाडकरांना प्रथमच अशा पोलिस बंदोबस्तात वावरण्याची वेळ आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती