शिवसेनेला मोठा फटका! आता रायगड जिल्ह्यात लोकप्रतिनिधीत्वच नाही

शुक्रवार, 22 जुलै 2022 (08:44 IST)
असे म्हणतात की घर फिरले की घराचे वासेही फिरतात, सध्या जिल्ह्यात मूळ शिवसेना पक्षाच्या बाबतीत असाच अनुभव आल्याचे म्हटले जाते. कारण रायगड जिल्ह्यातील शिवसेनेच्या एकूण तीन आमदारांपाठोपाठ मावळचे खासदार श्रीरंग बारणेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समर्थक विधिमंडळ व संसदेतील रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधित्व शिल्लक राहीले नाही.
 
शिक्सेना पक्ष प्रमुख ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का असून त्यांच्या बंडामुळे जिल्ह्यातील शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक असलेल्या १२ खासदारानी सेनेपासून वेगळी चूल मांडली आहे. त्यामध्ये बारणे यांचा समावेश आहे. श्रीरंग बारणे हे मोठे राजकारणी असून लोकसभेचे सदस्य आहेत. शिवसेनेचे सदस्य असलेल्या बारणे ह्यांनी लोकसभा निवडणुकांमध्ये मावळ मतदारसंघामधून दोनदा विजय प्राप्त केला. त्यांच्या मावळ मतदार संघातील पनवेल, उरण व कर्जत खालापूर हे तीन मतदार संघ रायगड जिल्ह्यातील आहेत.
 
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी शिंदे यांचा झेंडा हाती घेतला. महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी साथ देत सेनेला मोठे खिंडार पाडले होते. मात्र, सत्ता स्थापनेवेळी खासदार बारणे यांची भूमिका अस्पष्ट होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर शिंदे गट पुन्हा आक्रमक झाला. २० जूनपर्यंत जिल्ह्यात शिवसेनेचे ३, भाजपचे २ व राष्ट्रवादीचे १ आमदार तर राष्ट्रवादी व शिवसेनेचा प्रत्येकी एक खासदार असे संख्याबळ होते. दरम्यान, शिवसेनेच्या तिन्ही आमदार, खासदारानी बंडखोरी केल्याने आता महिनाभरात २१ जुलैला ठाकरे यांच्या हाती काहीच उरले नाही.
 
श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा खासदार झाले, तेव्हा प्रथमच लोकसभेवर निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. शिंदेंच्या बंडानंतर सुरुवातीच्या काळात बारणे यांनी उघडपणे कोणतीही भूमिका घेतली नाही. किंबहुना, शिवसैनिकांच्या बैठका घेत ‘खचू नका, गोंधळून जाऊ नका, संघटनात्मक बांधणी करा”, असे आवाहन बारणे करत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी मौनच राखले होते. मात्र, त्यांचे शिंदे परिवाराशी असलेले संबंध पाहता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच जातील, असे तेव्हा बोलले जात होते.
 
बदलत्या राजकीय घडामोडीत राष्ट्रपती- उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारणे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.दरम्यान, विकास कामे होत नाही अशी ओरड शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत होती. याची प्रचीती अलिबाग येथे झालेल्या जिल्हास्तरीय कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात आली होती.
 
तिन्ही आमदारांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने रायगडच्या पालकमंत्री बदला अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र या मागणीकडे उद्धव ठाकरे यांनी फारसे लक्ष दिले नव्हते. यामुळे पक्षनेतृत्वावर शिवसेनेच्या गोटात प्रचंड नाराजी होतीच. या नाराजीतूनच पक्ष नेतृत्वा विरोधात तीनही आमदारांनी बंडाचा झेंडा फडकला. आता बारणेही त्या गटात दाखल झाल्याने रायगड जिल्ह्यात शिवसेनेला सर्व काही नव्याने उभारणी करावी लागणार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती