कोरोना प्रतिबंधक लसींच्या दोन्ही डोसमधील अंतर ८४ दिवसावरुन २८ दिवसापर्यंत कसे करता येईल याबाबत विचार करण्यात यावा अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांच्याकडे केली आहे. राजेश टोपे दिल्लीत असून केंद्रीय मंत्र्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. राज्यातील विषयांवर आणि कोरोनाच्या उपाययोजना तसेच लसीकरणाच्याबाबत मांडवीया यांच्यासोबत राजेश टोपे चर्चा केली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १८ वर्षांखालील मुलांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर सुरु करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एकूण ५ विषयांवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरण वेगाने करण्याच्यादृष्टीने कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसावरुन २८ दिवसापर्यंत करता येईल का याचा फेरविचार करण्यात यावा. राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड लसीचा बुस्टर डोस देण्याबाबत विचार करण्यात यावा. तसेच मुलांच्या लसीकरणामध्ये १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण करण्याची सुरुवात करावी. संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविड संबंधीत मनुष्यबळ उपलब्ध करणेसाठी निधी पुरवणी पी.आय.पी मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावा. राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सादर केलेल्या पी.आय.पी मध्ये कॅथलॅब चालु करण्याचा प्रस्तावास मान्यता प्राप्त झाली नाही. तथापी, या संदर्भातील सुधारीत प्रस्तावास पुरवणी पी.आय.पी मध्ये मान्यता देण्यात यावी.