भाजप राज्यभर 20 हजार छोट्या सभांचं आयोजन करण्यात येणार

मंगळवार, 16 नोव्हेंबर 2021 (21:41 IST)
राज्यातील महिलांवरील अत्याचार, भ्रष्टाचार, अंमलीपदार्थांचे समर्थन, व्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न आणि राजकारणाचे गुन्हेगारीकरण याबाबत जनतेत जागृती निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यभर 20 हजार छोट्या सभांचं आयोजन करण्यात येईल, असं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. 
 
अमरावती, नांदेड आणि मालेगावच्या दंगलीची मास्टरमाईंड असलेल्या रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत करण्यात आली, अशी माहितीही चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
 
भाजपाच्या एक दिवसीय कार्यकारिणी बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना कामकाजाची माहिती दिली. पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाबाबत एक ठराव मांडण्यात आला. राज्यातील विविध घटकांवर महाविकास आघाडीने कसा अन्याय केला आहे, हे स्पष्ट करणारा राजकीय ठराव मांडण्यात आला. 
 
बलात्कार, अंमली पदार्थ, भ्रष्टाचार, व्यवस्था उध्वस्त करण्याचा प्रयत्न याबाबत समाजात जागृती निर्माण करण्यासाठी पक्षातर्फे राज्यभर सभा घेण्यात येतील. तसंच डिसेंबर महिन्यात मुंबईत मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
  
एसटी कामगारांच्या संपाला कार्यकारिणी बैठकीत पाठिंबा देण्यात आला. भाजपा नेते सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर कामगारांचे नेतृत्व करत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि अन्य सुविधा देणे शक्य आहे व त्यासाठी राज्य सरकारने आर्थिक बोजा सहन केला पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती