पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरास; तब्बल ७३ कोटींच्या विकास आराखड्याला मंजूरी

गुरूवार, 22 जून 2023 (07:24 IST)
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर विकास आराखड्यास आज राज्य सरकारने अंतिम मंजूरी दिली आहे. मंदिर विकास आराखड्यासाठी ७३ कोटी ८५ लाख ९५ हजार रूपये मंजूर केले आहेत. या निधीमुळे मंदिराचे प्राचीन सौंदर्य उजळून निघण्यास मदत होणार आहे.
 
तसेच मंदिराचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे. तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यासाठी १९ जुलै २०१६ च्या शासन निर्णयातील आराखड्याची कमाल किंमत मर्यादा २५ कोटी ही अट शिथिल करून पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे.
 
पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखड्याअंतर्गत कामांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून घेण्यासाठी जिल्हाधिकारी सोलापूर यांना संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. आराखड्यात प्रस्तावित असलेली कामे दोन टप्प्यात ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
 
पंढरपूर देवस्थान मंदिर विकास आराखडा अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांसाठी आवश्यक परवानगी घेणे, कामांना तांत्रिक मान्यता घेणे, कामांकरता निधी वितरण करणे आणि आराखड्याशी संबंधित शासनास सादर करायची विवरणपत्रे याची जबाबदारीही जिल्हाधिकारी सोलापूर यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती