पर्यटन विभागाकडून घेण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाला स्थगिती

शुक्रवार, 18 नोव्हेंबर 2022 (14:56 IST)
शिंदे-फडणवीस सरकारनं महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यटन विभागाकडून घेण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामाला स्थगिती दिली आहे. मविआ सरकारमध्ये राज्याचं पर्यटन विभाग आदित्य ठाकरे यांच्याकडे होतं. मविआ सरकार कोसळण्याच्या अवघ्या एक दिवस आधी घाईघाईत कोट्यवधी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. या सर्व कामांना शिंदे सरकारनं आता स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
आदित्य ठाकरे यांची ३८१ कोटी रुपयांची प्रादेशिक पर्यटन विकास योजना सुरू ठेवण्याबाबतही शिंदे सरकार संभ्रमात आहे. सत्तेत येताच मुख्यमंत्री शिंदेंनी या योजनेला स्थगिती दिली होती.  नंतर २०२२-२३ सोबतच गेल्या वर्षीच्या कामांवरील स्थगिती उठवून निधीही मंजूर केला. मात्र, निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होण्याआधीच पुन्हा एकदा या कामांना स्थगिती देण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे.
 
महाराष्ट्र सरकारनं आता पुन्हा एकदा जीआर जारी केला असून २ नोव्हेंबरच्या जीआरला स्थगिती दिली आहे. पर्यटन विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली गेल्यानं शिंदेंनी आदित्य ठाकरेंना दिलेला हा धक्का समजला जात आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती