चक्क चोराने लिहिला माफीनामा, परत केले दागिने

सोमवार, 10 जानेवारी 2022 (22:15 IST)
नाशिकमध्ये चोरीच्या बाबतीत आश्चर्यकारक गोष्ट घडली आहे. या घटनेत चक्क चोराने चोरी केलेले तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने परत केले आहेत. एवढेच नाही तर दागिने परत करताना चोराने चिठ्ठीद्वारे चक्क माफीनामा लिहून पाठवला आहे.
नाशिकमधल्या जेलरोडजवळील विठ्ठलनगर येथील शरद साळवे यांच्या घरात शनिवारी चोरी झाली. पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी तक्रार नोंदवली. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने याप्रकरणाचा तपास सुरू केला. पंचनामा करण्यासाठी आधी साळवे यांचे घर गाठले. त्यांनी चोरी कशी झाली, याची सविस्तर माहिती घेतली. किती ऐवज गेला, त्यात दागिने किती आणि पैसे किती अशी नोंद केल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली. चोराने कुठून प्रवेश केला असेल, याचा अंदाज बांधला. त्यानुसार ते छतावर चढले. तेव्हा त्यांना तिथे बॅग आढळली. त्या बॅगेत एक पत्र होते.
पोलिसांना सापडलेले ते पत्र त्या चोरट्याचे होते. विशेष म्हणजे त्याने ज्यांच्या घरात चोरी केली, त्या घरमालकाला हे पत्र लिहिले होते. त्यात पत्रातला मजकूर असा आहे. चोरटा म्हणतो, ‘मी तुमच्या गल्लीतलाच एक माणूस आहे. मी तुमची बॅग घेतली आणि पत्र्यावर टाकली. मला पैशांची गरज होती, पण मी ते घेतले नाहीत. सॉरी मला माफ करा.’ या पत्रासोबतच बॅगमध्ये सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र आणि चोरीचा ऐवज ठेवण्यात आला होता. मात्र, चोरट्याने चोरलेले दागिने आणि पैस देवून जाण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती