आठवले यांनी मांडला नवा फॉम्यूला, भाजपने पाठिंबा देऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करावा

सोमवार, 10 जानेवारी 2022 (21:58 IST)
शिवशक्ती, भीमशक्तीचा प्रयोग शिवसेनेबरोबर केला होता. शिवसेनेसोबत आमचे घरोब्याचे सबंध आहेत. रिपाइं ज्यांच्या  बरोबर जाते त्यांची सत्ता येते असे सांगत भाजपने शिवसेनेच्या सोबत जावे शिवसेनेला 5 वर्ष पाठिंबा देऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री ठेवण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांची प्रकृती सुधारावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच करोनाचा लढा देण्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. शिवसेना आता अडीच वर्षे मुख्यमंत्री पद या फॉर्म्युलावर ऐकणार नाही, त्यामुळे भाजपने उपमुख्यमंत्री पद घ्यावे आणि शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा नवा फॉम्यूला आठवले यांनी मांडला.
 
दलित बहुजन समाज एकसंघ करण्याचा आमचा विचार असल्याचे सांगतानाच दलित पँथरचे पुनरुज्जीवन करणार असल्याचा सुतोवाच त्यांनी केला. येत्या निवडणूकीसाठी  रिपाइंची तयारी असून, स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्षांना निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार देत असल्याचे सांगितले.
 
 येत्या निवडणूकीत रिपाइं पक्ष 5 ही राज्यात भाजपसोबत युती करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. चार राज्यात भाजपाची सत्ता आहे. यंदा पाचही राज्यात सत्ता आणणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष  हा खिळखिळा झाला आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढण्याचा निर्णय योग्य आहे. पण त्याचा फायदा काँग्रेसला होणार नाही. कारण काँग्रेसची ताकद कमी झालीय ही वस्तूस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती