एका दुःखद घटनेत मुकुंदवाडी परिसरातील तरुणी रस्त्यावरच्या पाणी साठलेल्या खड्ड्यात पडली. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की, ती खड्ड्यात पडून 20 फूटांपर्यंत वाहत गेली. आजूबाजूच्या नागरिकांनी तिला बाहेर काढून रुग्णालयात नेले, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला.
नेमकं काय घडलं?
मुकुंदवाडीतील राजनगर येथे रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली ज्यात रुपाली दादाराव गायकवाड या 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. शेंद्रा एमआयडीसीतील धुत ट्रान्समिशन कंपनीत कार्यरत असलेल्या रुपाली आणि तिची मैत्रीण आम्रपाली या दोघी मंगळवारी संध्याकाळी सात वाजला घरी जाण्यासाठी निघाल्या. पावसामुळे त्यांना मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यास उशीर झाला. दरम्यान मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे भले मोठे लोंढे वाहू लागले होते, सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. आठ वाजता दोघी एकमेकींचा हात धरून जात असताना कंबरेपर्यंत साठलेल्या पाण्यातून वाट काढताना रुपालीला अंदाज आला नाही आणि ती रस्त्यावरच्याच एका खोल खड्ड्यात पडली. पाण्याचा प्रवाह एवढा वेगवान होता की 20 फूटांपर्यंत वाहून गेली. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले आणि रुपालीला पाण्यातून बाहेर काढले, रुग्णालयातही दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
नातेवाइकांचा संताप
या घटनेनंतर बुधवारी दुपारपर्यंत पंचनामा करण्यासाठी पोलीस आणि मनपाचे अधिकारी आले नाही त्यामुळे संतप्त नातेवइकांनी रुपालीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. तेव्हा बसपाच्या लोकांना नागरिकांसह आंदोलनास सुरुवात केली. तेव्हा अखरे या भागातील रस्ते बनविणे आणि कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासान देण्यात आले. नंतर तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
शिक्षणासह नोकरी करत होती
शिक्षणाची खूप आवड असलेल्या रुपालीचे वडील मिस्त्रीकाम करतात. घरात आई-वडील, भाऊ, एक मोठी विवाहित बहीण आहे. लॉकडाऊनमुळे घरातील आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे तिने पुढे शिकायचे होते तरी नोकरी सुरु केली होती.