चाळीसगाव अपडेट : दोघांचा मृत्यू, शेकडो गुरे वाहिली

मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (23:28 IST)
चाळीसगाव तालुक्यात ढगफुटीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गिरणा, तितूर आणि डोंगरी या तिन्ही नद्यांना पूर आला असून वाकडी गावातील ६३ वर्षीय वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाला आहे तर पिंपरखेड परिसरात नदीच्या पुरात एक अनोळखी मृतदेह सापडला आहे. तसेच शेकडो गुरे पुरात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
 
चाळीसगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच नदी, नाल्यांना पूर आला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून चाळीसगाव शहरासह आजूबाजूच्या वाकडी, रोकडे, वाघडू, वाघळी, खिर्डे, लोंजे, जांभळी, मुंदखेडे, रहिपुरीसह १५ गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे.
 
तालुक्यातील वाकडी गावातील वृद्धा कलाबाई पांचाळ (वय ६३) यांचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. पिंपरखेड या गावी पुराच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह वाहून आला असून, त्याची ओळख पटलेली नाही.
 
चाळीसगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पुरामुळे शेकडो गुरे वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच कन्नड घाटात देखील एका वाहनावर दरड कोसळल्याने त्यात असलेल्या म्हशी दगावल्याचे समजते.
 
तालुक्यातील काही गावांमध्ये लोक अडकले असून, त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी एसडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. या पथकात ३५ जणांचा समावेश असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांनी दिली आहे. स्थानिक तरुण, सामाजिक मंडळांचे कार्यकर्ते मदतकार्यात जुंपले असून लोकप्रतिनिधी ठेवून आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती