खासदार राऊत यावेळी म्हणाले, जे कोरोना प्रतिबंधासाठीचे नियम पाळत नाहीत ते त्याच्या संसर्गाला आमंत्रण देतात. रुग्ण वाढले की ऑक्सिजनची मागणी वाढते त्यावेळी अशा प्रकारच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची गरज भासते. कोरोना लढाईत ज्या प्रकारे काम ठाणेकरांनी काम केलं आहे ते मार्गदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सरनाईक यांनी प्रास्ताविक केले. नगरसेविका परिषा सरनाईक आणि पूर्वेश सरनाईक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रताप सरनाईक फाउंडेशन व विहंग चॅरिटेबल ट्रस्टने – ठाणे शहरात, रेमंड कंपनी समोर, विहंग पाम क्लब येथे हा कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. ठाण्यातील हा ऑक्सिजन प्लांट सुरु होत असून दिवस-रात्र या प्लांटमधून आपल्या शहराला ऑक्सिजन सेवा मिळणार आहे. त्यासाठी प्रशिक्षित ऑपरेटर, कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करून त्याचे फिल्टरेशन करून ते सिलेंडरमध्ये भरले जाणार आहे. या प्लांटमधून १२० सिलेंडर ऑक्सिजन दिवसाला मिळणार आहे. हे ऑक्सिजन जनतेला विनामूल्य उपलब्ध होणार आहे.
हा ऑक्सिजन प्लांट लोकांसाठी २४ तास सुरु राहील. रिकामे सिलेंडर घेऊन येणाऱ्या नागरिकांना भरलेले ऑक्सिजन सिलेंडर येथून दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे सिलेंडर नसेल त्यांना डिपॉजिट घेऊन मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्याची ही योजना आमदार सरनाईक यांनी तयार केली आहे. दररोज निर्माण होणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा पालिका, सरकारी हॉस्पिटल तसेच गरज पडल्यास खासगी हॉस्पिट्लनाही केला जाईल. कोरोना पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत व त्यानंतरही ही ऑक्सिजन सेवा सुरु राहणार आहे.