मराठवाडा, खानदेशात मुसळधार पावसाने मोठे नुकसान नद्यांना महापूर; दरड कोसळल्याच्याही घटना

मंगळवार, 31 ऑगस्ट 2021 (16:00 IST)
राज्यात कृष्ण जन्माष्टमीच्या रात्रीपासूनच म्हणजेच ३० ऑगस्ट पासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परंतु गेल्या महिन्याभरापासून काही भागात पावसाने दडी मारल्याने पिकांना जीवदान देखील मिळाले आहे.कोकण, मराठवाडा, खानदेशात मुसळधार पावसाने मोठे नुकसान झाले असून अनेक नद्यांना महापूर आला आहे. काही ठिकाणी दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली आहे .मध्य महाराष्ट्रासह बहुतांश ठिकाणी रात्रीपासून पाऊस सुरूच असून धरणसाठ्यात वाढ आहे.तर काही ठिकाणी पिके पाण्याखाली गेली आहेत. पुण्यात आज दि.३१ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. साधारणतः सकाळी ६ वाजेपासूनच पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड, मोशी, चाकण, कात्रज परिसरातल्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळत आहे. गेले अनेक दिवस पुण्यात पावसाने दडी मारली होती. गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी तापमानात वाढ झाली होती परंतु आज सकाळपासूनच पाऊस पडत असल्याने तापमानातही घट झाली आहे.
 
गेल्या चारपाच दिवसापूर्वीच हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानंतर शनिवारपासूनच कोकणात पावसाला सुरुवात झाली. तर रविवारी आणि सोमवारी पावसाने आपला मोर्चा खानदेश मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात कडे वळविला. त्यामुळे राज्यात बहुतांश भागात आता पावसाचा जोर वाढला असून ठाणे,पालघर, मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी सोमवारी ३० ऑगस्टच्या रात्रीपासून पाऊस सुरू आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये तर पावसामुळे पाणीच पाणी साचले आहे.तर ठाणे,बदलापूर,अंबरनाथ,वसई,विरार, बोरीवली,नालासोपारा भागात तसेच पालघर मधील अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणीच पाणी दिसत आहे.त्यातच खड्ड्यांमुळे रहदारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यात आता हवामान विभागाने पुन्हा राज्यात पुढील सुमारे ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून काही ठिकाणी अतीमुसळधार पाऊसही पडू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.
 
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोकणात पावसाने हाहाकार उडाला होता परंतु ऑगस्ट महिन्यात मात्र राज्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली होती मात्र आता पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. हवामान विभागाने आधुनिक तंत्राच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असून पुणे, ठाणे जळगाव, धुळे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद,नांदेड,परभणी आणि बीडमध्ये सध्या जोरदार पाऊस कोसळत असून आणखी पुढील ४ दिवस पावसाचा जोर अधिक असेल असेही म्हटले आहे.पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टी लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता आहे. यात मुंबई, ठाणे, उत्तर कोकणाचाही समावेश आहे. दरम्यान ऑगस्टच्या अखेरच्या दिवशी आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून त्याची सुरुवात झाली आहे.खान्देश आणि मराठवाड्यात या पावसाने मोठे नुकसान झाले असून औरंगाबाद धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली.दरड कोसळून अनेक गाड्या महामार्गावरच उभ्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झाला असून अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. या घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे.घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.
 
मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. भिलदारी पाझर तलाव फुटल्यानंतर नागद परिसरात मोठा पूर आला. कन्नड आणि चाळीसगाव तालुक्यात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक नद्यांना आला पूर. कन्नड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. कन्नड तालुक्यातील अंबाडी धरण साठ्यात मोठी वाढ झाली असून तालुक्यातील बहिरगाव,अंधानेर, चिखलठाण भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तसेच शिवना नदीला देखील मोठा पूर आला आहे. अंजना नदीवरील पूलही मुसळधार पावसाने वाहून गेला असून पळशी आणि साखरवेल या गावांचा संपर्क तुटला आहे. अंजना नदीला जोरदार पूर आलाय.पुराच्या पाण्यात पूल वाहून गेलाय.पूल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला.कन्नड तालुक्यात अजूनही मुसळधार पाऊस सुरूच आहे.
 
दरम्यान, काल मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने बीड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला असूनआंबेसावळी नदीदेखील दुथडी भरून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीलादेखील पूरपाणी आले आहे.जिल्ह्यातील सर्वच नदी- नाले तुडुंब भरून वाहत आहेत. या पावसामुळे ऊसासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.जिल्ह्यातील अनेक नदीपात्र लगतच्या अनेक गावांना पुराचा तडाखा बसला आहे.मराठवाड्यातील जालना,लातूर, परभणी आदि जिल्ह्यात देखील रात्रीपासून पाऊस सुरूच आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती