या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना

मंगळवार, 5 जुलै 2022 (07:52 IST)
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या संदिप व बापु अकोलकर या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
 
याबाबत सविस्तर माहिती अशी की संदीप दत्तू अकोलकर (वय २९) व बाप्पू दत्तू अकोलकर (वय २७) हे सख्ये भाउ त्यांची शेती असलेल्या हाडे वस्ती जवळील बोरुडे तलावालगत असलेल्या भागात मेंढया चारण्यासाठी गेले होते मेंढ्या काही वेळ चारून झाल्यानंतर पाणी पाजण्यासाठी तलावामध्ये डबक्यात असलेल्या पाण्यावर ते गेले.
 
मेंढ्यांचे पाणी पिऊन झाले नंतर संदीप पाण्यात उतरून मेंढ्या देऊ लागला. मेंढ्या धूत असतानाच संदीपचा पाय खोलात गेला व त्याने लहान भाऊ बापूला आवाज दिला. बापूने हात दिला व संदीपला वर काढू लागला. या ओढाताणीत बापूच पाण्यात गेला.
 
दोघेही पाण्यात पडले दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. नंतर इतरांनी या दोघा भावांना पाण्यातून बाहेर काढले परंतु तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. संदीप यास एक तीन महिन्याचा मुलगा आहे.तर बाप्पू अकोलकर हा अविवाहित होता. एकाच कुटुंबातील सख्या दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडल्याने करंजी गावात शोककळा पसरली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती