समृद्धी महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा टप्पा या तारखेपासून सुरू होणार

सोमवार, 18 जुलै 2022 (15:16 IST)
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारकडून वारंवार हा महामार्ग सुरू करण्यासंबंधी तारखाही घोषित करण्यात आल्या आहेत. मात्र हा महामार्ग कधी सुरु होणार ? असा प्रश्र आता नागरिक करु लागले आहेत. याचे उत्तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. नागपूर- शिर्डी समृद्धी महामार्ग स्वातंत्र्यदिनी म्हणजेच दि. १५ ऑगस्टला सुरु होणार असे त्यांनी सांगितले आहे.

याआधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात समृद्धी महामार्गाचे उद्घाटन दोन ते तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आले होते. समृद्धी महामार्ग वाहनांसाठी लवकरच खुला होणार आहे. या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्ग सुरू करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
मुंबई ते नागपूर जलद रस्ते प्रवासासाठी ७०१ किमीचा समृद्धी महामार्ग एमएमएसआरडीसीकडून बांधण्यात येत आहे. ५५ हजार ३२५ कोटी ३२ लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला २०१९ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. एमएसआरडीसीने नागपूर ते शिर्डी आणि शिर्डी ते मुंबई अशा टप्प्यात प्रकल्पाचे काम पूर्ण करत प्रकल्प वाहतुकीसाठी खुले करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार २०२१ दोन टप्प्यांत हा संपूर्ण मार्ग पूर्ण करण्यात येणार होता. मात्र काम सुरू झाल्यानंतर काही महिन्यांतच करोना तसेच टाळेबंदीचे संकट आले आणि त्याचा मोठा फटका या कामाला बसला. मोठ्या संख्येने मजूर काम सोडून गेल्याने काही महिने काम ठप्प होते.
 
करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर मात्र एमएसआरडीसीने कामाला वेग दिला. हा वेग पाहता मार्च २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी ५२० किमीचा टप्पा, तर डिसेंबर २०२२ अखेरीस शिर्डी ते मुंबई टप्पा पूर्ण करत वाहतूक सेवेत दाखल करू असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला केला जाऊ शकणारा हा टप्पा नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीचा नसून तो केवळ ३६० किमीचा नागपूर ते वैजापूर, औरंगाबाद असा असेल. कारण नागपूर ते शिर्डी टप्प्यातील पॅकेज ५ आणि ७ मधील पुलांची कामे रखडल्याने तीन टप्प्यांत प्रकल्प पूर्ण करत मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
 
सुमारे 701 किलोमीटरच्या ‘समृद्धी महामार्गाची’ घोषणा विधानसभेत केली. प्रत्यक्षात राज्याच्या 10 जिल्ह्यातून जरी हा महामार्ग जात असला तरी एकूण 24 जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. या महामार्गाच्या बांधकामाच्या सुरुवातीला अनेक अडचणी आल्यात आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. अनेक अडचणींना सामोरं जात सरकारनं हा महामार्ग जवळपास पूर्णत्वाला नेला आहे. मात्र समृद्धी महामार्ग सुरू करण्यासंबंधी सरकारनं अनेकदा तारीख घोषित केली, अनेक ठिकाणी कामं अपूर्ण असल्यानं 31 मार्च 2022 पर्यंत नागपूर शिर्डी हा पहिला टप्पा सुरू करणार असं गेल्या सरकारकडून सांगण्यात आले होते. पण अजूनही समृद्धी महामार्गाचे काम सुरुच आहे.
 
वारंवार सरकारकडून तारखा जाहीर झाल्यावरही समृद्धी महमार्ग का सुरू होऊ शकत नाही? असा प्रश्न आता उपस्थित राहत आहे. एकूण 16 टप्प्यांत या महामार्गाचं बांधकाम सुरू असून एकंदरीत नागपूर मुंबई या 701 किलोमीटरच्या महमार्गात एकूण 1699 ठिकाणी छोटी मोठी बांधकामे असून यातील जवळपास 1400 च्यावर बांधकामं पूर्ण झाली असून उरलेली बांधकामं अजून तरी जवळपास एक वर्षांचा कालावधी घेतील, अशी माहिती मिळाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती