बिहारमध्ये मराठी कुटुंब आगीत भाजलं, मुख्यमंत्री शिंदेंनी उपलब्ध करून दिलं चार्टर फ्लाईट

सोमवार, 18 जुलै 2022 (09:37 IST)
बिहार मधील पाटणा येथे, महाराष्ट्रातील मौजे गुरसाळे, ता.खटाव जि. सातारा येथील अमोल जाधव यांचे कुटुंब उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहे. शनिवारी मध्यरात्री 2 वाजता राहत्या घरात गॅसच्या गळतीने मोठा स्फोट होऊन, कुटुंबातील चारही लोकांना मोठ्या प्रमाणात जखमी झाले.
 
त्यांना तात्काळ पाटणा येथे खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. परंतु तेथील डॉक्टरांनी रुग्णांना पुढील उपचारांसाठी पुणे किंवा मुंबई येथे जळालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या विशेष दवाखान्यात हलविण्यास सांगितले. त्यानंतर या कुटुंबाच्या नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी पुण्याला नेण्याचा निर्णय घेतला आणि एअर अॅम्ब्युलन्स मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
 
अशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनवर कुटुंबाला आणण्यासाठी 2 विशेष विमानं बिहारमध्ये दाखल झाली. मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना सकाळी 11 वाजताच पुण्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
 
त्यावेळी एका नातेवाईकाने सांगलीचे आमदार अनिल बाबर यांचे मार्फत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क केला. संपर्क झाल्यावर नातेवाईकांनी सर्व हकीकत मुख्यमंत्र्यांना सांगितली. त्यानंतर तात्काळ सूत्रे फिरण्यास सुरुवात झाली.
 
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी प्रथम आणि नंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना अतितत्काळ, शासकीय एअर अॅम्ब्युलन्स मिळण्यासाठी विनंती केली, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शासकीय एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही. वेळ अतिशय नाजूक असल्याने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी विनाविलंब स्वखर्चातून 2 एअर अॅम्ब्युलन्स बुक केल्या. पुण्यातील सूर्या सह्याद्री रुग्णालयात दाखल केले असून, उपचार सुरू आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती