शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. सत्तेतून पायउतार व्हावे लागल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बोलत होते.
"मी जी भूमिका घेतली, ती लोकांनी स्वीकारली आहे. त्यावेळी आम्हाला विचारण्यात आलं, की हे कशासाठी सुरु आहे. आमचा यामध्ये स्वार्थ नाही, हे आम्ही त्यांना सांगितलं. माझ्यासोबत सात मंत्री आले. विरोधी पक्षातून सत्तेकडे जाण्याचा ओघ असतो. मात्र इथे उलटं झालं. सत्तेतील माणसं बाहेर पडली. एक-दोन नव्हे तर पन्नास लोक बाहेर पडले," असे शिवसेनेतील बंडखोरीबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.