शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय ४ ते ५ दिवसात होणार

गुरूवार, 19 ऑगस्ट 2021 (21:42 IST)
राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं सुरु करण्याचा निर्णय येत्या ४ ते ५ दिवसात होईल, असे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. शालेय शिक्षण विभाग आणि उच्च, तंत्र शिक्षण विभागांचा अहवाल टास्क फोर्सला प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भातला पुढचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्य सरकारनं शाळा सुरु करण्यासंदर्भात यापूर्वीच निर्णय घेतला होता. पण मुलांचं लसीकरण न झाल्यानं टास्क फोर्सच्या विरोधानंतर हा निर्णय तात्काळ स्थगित करण्यात आला. आता काय निर्णय होतो, याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागून आहे.
 
“कॉलेज आणि शाळांच्या बाबतीत आम्ही स्पष्ट उल्लेख केला आहे की, त्या दोन्ही विभागाने त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत असतील, वर्षा गायकवाड असतील. या दोघांशी माझी चर्चा झाली आहे. त्या दोघांचं म्हणणं आहे की, टास्क फोर्सचं म्हणणं महत्त्वाचं आहे. चार-पाच दिवसात टास्क फोर्सचे अहवाल येतील. संबंधित विभाग चर्चा करतील आणि निर्णय घेतील.”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
 
वर्षा गायकवाड यांनी राज्यात १७ ऑगस्टपासून शाळा सुरू होणार असल्याची घोषणा केली होती. यामध्ये ग्रामीण भागात जिथे ८ वी ते १२वी याआधीच सुरू आहेत, तिथे ५वी ते ७वीचे वर्ग देखील सुरू करणे आणि नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगर पालिका या ठिकाणी रुग्णसंख्या आणि इतर अटींची पूर्तता करणाऱ्या भागांमध्ये ५वी ते १२वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलं होतं. वर्षा गायकवाड यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरातील विद्यार्थी आणि पालकांमध्ये दिलासादायक चित्र निर्माण झालं होतं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती