असे आहेत राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

गुरूवार, 12 ऑगस्ट 2021 (08:39 IST)
राज्यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात राज्यात सर्व ठिकाणी आता रेस्टॉरंट्स, हॉटेल्सला ५० टक्के क्षमतेनं रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १५ ऑगस्टपासून होणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत राजेश टोपे यांनी निर्णयांची माहिती दिली. राज्यात आता निर्बंधांबाबत शिथिलता देण्याचा महत्वापूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून यात रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स १५ ऑगस्टपासून रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. हा निर्णय संपूर्ण राज्यासाठी लागू असणार आहे, असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट्स मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं एक महत्वाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली असली जरी ज्या दिवशी राज्याची ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रीक टनच्या वर पोहोचेल तेव्हा राज्यात लगेच कडक लॉकडाऊन जारी केला जाईल असा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असल्याचं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.
 
राज्यातील शॉपिंग मॉल्सला रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली असली तरी मॉल्समध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेशाची परवानगी देण्यात येईल, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.
 
मंगल कार्यालयांसाठी मर्यादा वाढवली
लग्नकार्यासाठी खुल्या जागेवर २०० माणसांना तर बंद हॉलमध्ये निम्म्या क्षमतेच्या किंवा १०० माणसांपर्यंत उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. हा निर्णय देखील १५ ऑगस्टपासून लागू होणार आहे, असं टोपे यांनी सागितलं आहे.
 
आता नेमकं काय सुरू आणि काय बंद ?
– राज्यात आता सर्वच ठिकाणी रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि शॉपिंग मॉल्स रात्री दहा वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
 
– राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स एकूण क्षमतेच्या ५० टक्के सुरू ठेवता येणार आहेत. तसेच शॉपिंग मॉल्समध्ये कोरोना विरोधी लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाच प्रवेश असणार आहे. निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याबाबचे निर्णय १५ ऑगस्टपासून लागू होणार आहेत.
 
– राज्यातील सर्व दुकानं देखील रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. यात दुकानातील कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण होणं गरजेचं आहे.
 
– राज्यातील खासगी कार्यालयं आता कर्मचाऱ्यांच्या वेळेच्या व्यवस्थापनासह २४ तास सुरू ठेवता येणार आहेत. यात कर्मचाऱ्यांचं कोरोना विरोधी लसीकरण पूर्ण करावं लागणार आहे.
 
– विवाह सोहळ्यासाठी आता खुल्या जागेतील सोहळ्यासाठी एकूण २०० जणांच्या, तर बंद हॉलमधील सोहळ्याला क्षमतेच्या ५० टक्के किंवा एकूण १०० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.
 
– राज्यात चित्रपटगृह, नाट्यगृह आणि धार्मिक स्थळं अद्याप बंदच राहणार आहेत. याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
– याशिवाय राज्यातील शाळा, महाविद्यालयं सुरू करण्याबाबत एकमत झालेलं नसल्यानं त्यावरही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.
 
– राज्यात ज्यादिवशी दैनंदिन पातळीवर ७०० मेट्रीक टन ऑक्सिजनची मागणी निर्माण होईल त्याच दिवशी तातडीनं कडक लॉकडाऊन करण्यात येणार.
 
मंत्रिमंडळ बैठकीतील अन्य निर्णय :
केंद्र पुरस्कृत नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह योजनेत राज्य सरकारही सहभागी होणार आहे. राज्यात अशा पद्धतीने वसतिगृह चालविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापुर्वी ही योजना केंद्र आणि स्वयंसेवी संस्था यांच्या ७५:२५ अशा सहभागातून राबविण्यात येत होती. या योजनेच्या केंद्र शासनाच्या २२ नोव्हेंबर २०१७ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये अंशत बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह बांधण्यासाठी/वसतीगृहाची इमारत भाडे तत्वावर उपलब्ध करुन अनुदान देण्याची सुधारित योजना राबविण्यात येणार आहे.
 
यात केंद्र : राज्य : स्वयंसेवी संस्था यांच्या हिश्श्याचे प्रमाण अनुक्रमे ६०:१५:२५ असे राहणार आहे. असे वसतिगृह योजना राबविण्यास इच्छूक संस्थेला त्यांच्या इमारत भाडयापोटी वार्षिक निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. वसतिगृह प्रवेश आणि त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांबाबत नियम, अटी-शर्ती या पूर्वीच्या योजनेप्रमाणेच राहतील.
 
दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षकांची पदे लोकसेवा आयोगामार्फत भरणार
नोंदणी व मुद्रांक विभागातील दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील सरळ सेवेची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज घेण्यात आला. विभागाच्या सेवाप्रवेश नियमानुसार, दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) या पदावर पदोन्नतीने व नामनिर्देशनाने नियुक्तीचे प्रमाण ५०:५० करण्याचा तसेच दुय्यम निबंधक (श्रेणी-१) / मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) ही पदे नामनिर्देशनाने आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
अनाथांच्या एक टक्का आरक्षण धोरणाची व्याप्ती वाढवली
अनाथ मुलांना शिक्षण व नोकरीत एक टक्का आरक्षण देण्याच्या धोरणात बदल करून आता तीनही वर्गातील अनाथांना शिक्षण आणि नोकरीत तसेच आरक्षण देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. अनाथांचे ‘अ’ ‘ब’आणि ‘क’ अशा तीन प्रवर्गात वर्गीकरण करुन तिन्ही प्रवर्गातील अनाथ मुलांना शिक्षण व नोकरी मध्ये आरक्षण लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
 
अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गातून लागू करण्यात आलेल्या १ टक्का समांतर आरक्षणाऐवजी दिव्यांगांच्या धर्तीवर १ टक्का समांतर आरक्षण लागू करण्यास मान्यता देण्यात आली. अनाथ आरक्षणासाठी पदांची गणना पदभरतीच्या तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी एकूण पदसंख्येच्या १ टक्का इतकी लागू करण्यास मान्यता देण्यात आली. अनाथ आरक्षणासाठी अर्ज कऱणा-या उमेदवारास अनुसुचित जाती या प्रवर्गासाठी निश्चित केलेले वय, शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, किमान गुणवत्ता पात्रता इत्यादी निकष लागू करणार. अनाथ मुलांच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक शुल्काची संपूर्ण प्रतिपुर्ती तर उच्च शिक्षणासाठी (पदवी व पदव्युत्तर) शासकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनाथ मुलांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधीमधून करणार.
 
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभर १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार असून आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत त्याचे सादरीकरण करण्यात आले. केंद्र शासनाने प्रत्येक राज्याचे ‘राज्यगीत’ तयार करण्यात यावे अशी सूचना केली आहे. त्याअनुषंगाने राज्यगीताची निर्मिती करण्यावर देखील चर्चा करण्यात आली. या सोहळ्यानिमित्त राज्यभर शिक्षण, सांस्कृतिक, पर्यटन, नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, सहकार, कृषी व महिला व बालकल्याण इत्यादी विभागांतर्गत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. त्यामध्ये विद्यार्थी, नागरिक, विविध संस्था यांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर असेल.
 
भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला पुढील वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने १५ ऑगस्ट २०२३ पर्यंत राज्यभर विविध कार्यक्रम राबवून अमृतमहोत्सवी वर्षाचा सोहळा साजरा करणे अपेक्षित आहे. त्यासंदर्भात हे सादरीकरण करण्यात आले. इंडिया @७५ या अंतर्गत विविध कार्यक्रम राबवावयाचे असून, स्वातंत्र्य लढा, संकल्प, संकल्पना, साध्य व कार्यवाही या बाबींवर आधारित कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल. कार्यक्रमांची संकल्पना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव याभोवती गुंफलेली असेल. भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नाविन्यपूर्ण कल्पना, नवे संकल्प, स्वातंत्र्योत्तर फलनिष्पत्ती आणि अंमलबजावणी या संकल्पनेवर कार्यक्रम आधारलेले असतील.
 
स्वातंत्र्य चळवळीतील अज्ञात नायकांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांचा इतिहास जतन करणे, त्यांच्या निवासस्थानी भेट देणे, संबंधित जिल्ह्यातील स्वातंत्र्यलढ्यातील निगडीत महत्वाची ठिकाणे, स्वातंत्र्य चळवळींशी संबंधित व्यक्तीमत्वे यांचा इतिहास जतन करणे, पथनाट्य, महानाट्य, चर्चासत्र, प्रदर्शन मेळावे, लोककलेचे सादरीकरण, हेरिटेज वॉक, सायकल वॉक या कार्यक्रमांचे लोकसहभागातून आयोजन करण्यात येईल.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती