भाजपा मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जो पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभा राहील

शुक्रवार, 11 जून 2021 (16:58 IST)
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.  संभाजीराजेंच्या भूमिकेवर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना महाराष्ट्र सरकारबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. “संभाजीराजे यांनी चालढकल केली, तर भाजपा मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी जो पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभा राहील, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना पाटील म्हणाले,”मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली, तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. असं झालं तर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कुणाकडे तरी जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. मात्र, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचं मोठं नुकसान होईल. छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी, तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी केला पाहिजे,” असा इशारा वजा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना दिला आहे.
 
“छत्रपती संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार, एकदा लाँग मार्च काढणार असे सांगतात. कोल्हापुरातही १६ जून रोजी मराठा मोर्चा निघणार का, याची अद्याप शाश्वती नाही. या सर्व गोष्टी माध्यमांनी मराठा समाजासमोर नीटपणे मांडल्या पाहिजेत. संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मी त्यांना पाठिंबा जाहीर केला. आता त्यांनी माघार घेतली तरी भाजपच्या भूमिकेत फरक पडणार नाही. पण उद्या कोल्हापुरात दुसरं कुणी पुढाकार घेऊन मोर्चा काढला तर भाजपा त्यांनाही पाठिंबा देईल,” असं चंद्रकांत पाटील स्पष्ट केलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती