येत्या 4 व 5 मार्चला नाशिकमध्ये 11 वे अखिल शेतकरी साहित्य संमेलन

शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (08:54 IST)
लेखणीतून शेतीची दुरवस्था थांबवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्यासाठी  शक्तिशाली, सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण व्हावी, या उद्देशाने येत्या  4 व 5 मार्चला नाशिकमध्ये 11 वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन होत आहे. याबाबत अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळीचे संस्थापक अध्यक्ष गंगाधर मुटे यांनी ही माहिती दिली. 
 
शेतीला भेडसावणाऱ्या दाह वास्तवाची जाणीव मराठी साहित्य विश्‍वाला होण्याच्या उद्देशाने हे संमेलन होत आहे.  शेती उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून शेतीउद्योगाला नवी दिशा देणाऱ्या मोहाडी (जि. नाशिक) येथील सह्याद्री फार्म्स परिसरात हे संमेलन भरत आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक भानू काळे संमेलनाचे अध्यक्ष असतील. नाम फाउंडेशनचे संस्थापक तथा चित्रपट अभिनेते नाना पाटेकर संमेलनाचे उद्‍घाटन करतील. ज्येष्ठ शेतकरी नेत्या सरोज काशीकर, ज्येष्ठ शेतकरी नेते अ‍ॅड. वामनराव चटप प्रमुख पाहुणे असतील.
 
सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे स्वागताध्यक्ष असून, गंगाधर मुटे कार्याध्यक्ष आहेत. तसेच संयोजक म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सतीश बोरुळकर यांची निवड करण्यात आली. संमेलनसाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.
 
कौशल्य गुणांचे, प्रतिभेचे प्रदर्शन मांडून साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबिर ठरावे आणि सशक्त लेखणीतून इंडियाच्यासमवेत भारतालाही समृद्ध व संपन्न करण्यासाठी हातात लेखणी घेऊन लढणाऱ्या सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्याचा उद्देश या संमेलनामागे आहे.
 
संमेलनाचे उद्‍घाटन सत्र, शेतकरी कविसंमेलन, शेतकरी गझल मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविध कार्यक्रम संमेलनात असतील. संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्र, अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आदी वक्ते सहभागी होतील. शेतीप्रेमी साहित्यिक आणि रसिकांनी अधिक नोंदणी करून उपस्थित राहावे, असे श्री. मुटे यांनी स्पष्ट केले.

Edited by -Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती