छत्रपती संभाजीनगर :वीस वर्षांपूर्वीचे 79 कोटींचे मुद्रांक नष्ट

शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (08:31 IST)
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा कोषागार कार्यालयातील 79कोटींचे मुद्रांक गुरुवार दि. 28 डिसेंबर रोजी गोपनीयरित्या नष्ट करण्यात आले. तेलगी मुद्रांक घोटाळा उघडकीस आल्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने सर्व जिल्ह्यांना दिले होते. त्यामुळे तेलगी घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर 2003 मधे मुद्रांकांची विक्री थांबविण्यात आली होती. हे मुद्रांक गेल्या वीस वर्षांपासून कोषागार कार्यालयात होते. राज्य सरकारने त्याकाळातील वापरात नसलेले मुद्रांक येत्या 31 डिसेंबरपर्यंत नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, जिल्हा मुद्रांक अधिकारी विवेक गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडुन मुद्रांक नष्ट केले जात आहेत.
 
सन 2001मधे अब्दुल करीम तेलगी याला मुद्रांक घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याकाळात तेलगीने मुद्रांकांची विविध राज्यांमध्ये पुरवठा साखळी तयार केली होती. यावेळी त्याने 176 कार्यालये थाटली होती. ही कार्यालये चालवण्याची जबाबदारी बेरोजगार तरुणांना देण्यात आली होती. तेलगीच्या दिमतीला सहाशे जणांची टीम देशभरात काम करत होती. या टीमने देशातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारचे मुद्रांक विकले होते. त्यात मुद्रांक, ज्युडिशियल कोर्ट फी स्टँप, नॉन ज्युडिशियल स्टँप आणि रेव्हेन्यू स्टँप यांचाही समावेश होता. बँका, विमा कंपन्या आणि सरकारी कार्यालयांना हे बनावट मुद्रांक विकले जात होते. तेलगीच्या घोटाळ्याचा 13 राज्यांना आर्थिक फटका बसला होता. त्यानंतर 2003 मधे मुद्रांकांची विक्री थांबवत नव्याने मुद्रांकांचे क्रमांक आणि त्यावरील डिझार्इन बदलण्यात आले होते. या घोटाळ्यादरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दाखल झालेले ७९ कोटींचे मुद्रांक कोषागार कार्यालयाच्या तिजोरीत ठेवण्यात आले होते. हे मुद्रांक 31 डिसेंबरपर्यंत नष्ट करण्यात यावे, असे आदेश राज्य सरकारने सर्वच जिल्ह्यांना दिले होते. त्यानुसार,सकाळपासून मुद्रांक नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती