मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात पुन्हा एकदा भेट; नेमकी चर्चा कशावर?

शुक्रवार, 29 डिसेंबर 2023 (08:09 IST)
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आज भेट घेतली. यावेळी मनसे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित होते. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीत राज्यातील टोल नाके आणि दुकानांवरील मराठी पाट्यांबाबत चर्चा झाल्याचं समजतंय  
 
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वारंवार भेटी-गाठी झालेल्या आहेत. आज होणारी भेट ही सहावी भेट असल्याचे सांगितले जाते. तसेच बंद दाराआड दोन्ही नेत्यांनी अर्धा तास चर्चा केली. त्यामुळे या वारंवार होणाऱ्या बैठकामागे राजकीय कारण आहे की? इतर काही प्रश्न, याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
 
22जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचे उदघाटन होणार आहे. दोन दिवसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौरा करणार आहेत. तसेच कालच राज ठाकरे यांनाही राम मंदिर उदघाटन सोहळ्याचे निमंत्रिण मिळणार असल्याची बातमी आली होती. याआधी राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा करण्याची घोषणा केली होती.
 
मात्र भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी जोरदार प्रतिकार केल्यामुळे राज ठाकरे यांना आपला अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. आता ते पुन्हा अयोध्येत जाण्याचा प्रयत्न करणार का? असा एक प्रश्न आहे.
 
तसेच मराठी पाट्या आणि टोल नाके या विषयांचा मनसे खूप आधीपासून पाठपुरावा करत आहे. सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांची याचिका फेटाळून लावल्यानंतर दुकानांवर मराठी पाट्या लवकर लावाव्यात तसेच या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मनसेची जुनी मागणी आहे. त्याचाही पाठपुरावा या बैठकीत घेतला गेल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती