भाडेकरुने घर रिकामं करण्यासाठी केली साडेचार लाखांची मागणी, त्रासाला कंटाळून घरमालकाचा गळफास

मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (14:36 IST)
नागपूरमध्ये जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कस्तुरबा नगर परिसरात मुकेश रिझवानी यांचे घर आहे. 2019 साली कोरोनाचा थैमान असताना घर मालक मुकेश रिझवानी यांनी राजेश सेतीया नामक व्यक्तीला घराच्या काही खोल्या भाड्याने दिल्या होत्या. मुकेश यांना घर भाडे अपेक्षित होते, मात्र राजेश सेतीया आणि त्याचा भाऊ मूलचंद सेतीया यांनी मुकेश रिझवानी यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.
 
साडेचार लाखांची मागणी
आरोपी भाडेकरु राजेश सेतीया मुकेश यांना वारंवार धमकी देत होता आणि सांगत होता की घर रिकामे करून हवे असल्यास साडेचार लाख रुपये द्यावे लागतील, मुकेश रिझवानी यांनी घर सोडण्यासाठी सेतीयाला काही पैसेही दिले मात्र आरोपी राजेश आणखी पैसे मागत होता. 
 
भाडेकरुकडून सतत होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून मुकेश यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र घटनेनंतर दोन्ही आरोपी भाऊ फरार झाले आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.
 
व्हिडीओ व्हायरल
घरमालक मुकेश हे भाडेकरु राजेश सेतीयामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करत होते. अखेर त्यांनी कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली, मात्र त्यापूर्वी मुकेश यांनी एक व्हिडीओ तयार केला, ज्यामध्ये त्यांनी भाडेकरुच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. तो व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती