प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याबाबत खुद्द प्रकाश आंबेडकरांनी खुलासा करत रात्री ही भेट झाल्याचं कबूल केले. पण त्याचसोबत प्रत्येकवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटलो म्हणजे राजकीय चर्चा झाली असं नाही. इंदू मिलमधील स्मारकाबाबत बैठकीत चर्चा झाली. आमची आघाडी आजही ठाकरेंसोबत कायम आहे असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मी साडेदहा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेलो. मध्यंतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची प्रतिमा नोएडात बनवली जातेय. त्यासाठी सरकारकडून एक टीम पाठवण्यात आली होती. त्या पथकानं विविध शिफारसी दिल्या. त्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत चर्चा झाली. बऱ्याच गोष्टी चर्चेत झाल्या. आगामी निवडणुका शिवसेना ठाकरेंसोबत लढवायच्या यात कुठेही बदल झाला नाही. ज्या पक्षासोबत भाजपा त्यांच्यासोबत वंचित बहुजन जात नाही. भाजपासोबत वैचारिक लढाई आहे. भाजपाच्या मित्रपक्षासोबतही कधीच समझौता नाही असं त्यांनी सांगितले.