या प्रशिक्षणाला २ जानेवारी पासून सुरुवात झाली असून हे प्रशिक्षण ६ ऑगस्ट रोजी संपणार आहे. तसेच मार्च आणि एप्रिलमध्ये आणखी २६४० भावी अग्नीवीर या ठिकाणी प्रशिक्षणाला हजर होणार आहेत. या योजनेतून जरी चार वर्ष देश सेवा होणार असली, तरी या चार वर्षात जास्तीत जास्त मातृभूमीच्या सेवेसाठी प्रयत्न करून आणखी आयुष्यभर सैन्यात काम करण्याची इच्छा तरुणांनी व्यक्त केली.
देशभरातील एकूण ४६ ठिकाणी अग्निवीरांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. यात महाराष्ट्रातील पुणे, नाशिक (नाशिकरोड), नागपूर येथील प्रत्येकी एक आणि अहमदनगर येथे दोन ठिकाणी हे प्रशिक्षण सुरू आहे. या भरतीसाठीचे हे प्रशिक्षण ३१ आठवड्यांचे असून यामध्ये दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात बेसिक मिलिटरी ट्रेनिंग दहा आठवडे राहणार असून दुसऱ्या टप्प्यात ऍडव्हान्स मिलिटरी ट्रेनिंग २१ आठवड्यांची असणार आहे. या प्रशिक्षणात वेपन ट्रेनिंग, व्यायाम, ड्रिल, कॉम्प्युटर आणि मॅप रीडिंग याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती सैन्य विभागाकडून देण्यात आली.
नाशिकमढील अग्निवीर सेंटर..
नाशिकच्या नाशिकरोड येथील तोफखाना केंद्राच्या अशोकचक्र प्रवेशद्वारातून आत प्रवेश करताच स्वतंत्र असे अग्निवीर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाते. तसेच युद्धभूमीवरील छायाचित्रे लावण्यात आली असून, हे छायाचित्र तरुणांमधील देशसेवेची ऊर्जा अधिकच वाढवतात. अशा रीतीने देश सेवेत सज्ज होण्यासाठी भावी अग्निवीर प्रशिक्षण घेत आहे आणि भारतीय सैन्यात सामील होऊन देशसेवा करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी परिश्रम घेत आहे.