आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची गृह विभागाने मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. हे खास पद नव्यानेच तयार करण्यात आले आहे. हे पद अपर पोलीस महासंचालक दर्जाचे असेल. मुंंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालील पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करता यावे म्हणून हे पद तयार केल्याचे गृह विभागाने शासन आदेशात स्पष्ट केले आहे. याचाच अर्थ मुंबईचे पाचही सह आयुक्त यापुढे थेट मुंबई आयुक्तांना रिपोर्टिंग न करता विशेष पोलीस आयुक्तांना रिपोर्टिंग करतील. मुंबई पोलीस आयुक्त आणि सह आयुक्तांमधील फळीत हे नवे पद तयार करून गृह विभागाने एका अर्थाने मुंबई पोलीस आयुक्तांची शक्ती काढून घेत विशेष पोलीस आयुक्तांना सुपर कॉप बनवले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलात हे पद प्रभावी ठरणार आहे.
देवेन भारती हे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील अधिकार्यांपैकी सर्वात जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) कलम 22 अन्वये शासनास प्राप्त अधिकारांतर्गत हे विशेष पद तयार करण्यात आले आहे. त्यानुसार विशेष पोलीस आयुक्त, हे पोलीस आयुक्तांच्या अधिपत्याखालील सर्व पोलीस सह आयुक्तांच्या कामाचे संनियंत्रण व पर्यवेक्षण करतील. म्हणजेच मुंबईतील सह पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), सह पोलीस आयुक्त (प्रशासन), सह पोलीस आयुक्त (गुन्हे), सह पोलीस आयुक्त (आर्थिक गुन्हे शाखा) आणि सह पोलीस आयुक्त (वाहतूक) हे पाचही सह पोलीस आयुक्त यापुढे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना रिपोर्टिंग करतील. या अधिकार्यांचा कंट्रोल देवेन भारती यांच्याकडे राहणार असल्याने देवेन भारती मुंबई पोलीस दलातील सुपर कॉप ठरणार आहेत.