राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. आज अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विविध मुद्द्यांवरून चांगलाच धरेवर धरलं आहे. दरम्यान, विधानभवानाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं खळबळ उडाली आहे. हा व्यक्ती पेशाने शेतकरी असून त्याने व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. संबंधित व्यक्ती उस्मानाबाद जिल्ह्यातील तांदुळवाडी (ता. वाशी) येथील असल्याचं समोर आलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, उस्मानाबाद येथील तांदुळवाडीगावचे असणारे शेतकरी सुभाष भानुदास देशमुख यांनी विधिमंडळ परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला. देशमुख यांनी विधानभवनाबाहेर अंगावर रॉकेल ओतून घेतल्यानंतर त्यांनी स्वत:ला पेटवून घेतलं. यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणली आणि देशमुख यांना रुग्णालयात दाखल केलं. शेतीच्या वादातून हा आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळत आहे.