लवकरच कडक लॉकडाउन! दोन दिवसांत मुख्यमंत्री घेणार निर्णय

सोमवार, 19 एप्रिल 2021 (16:09 IST)
राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली असली तरी परिस्थिती अद्यापही नियंत्रणा बाहेर असल्याचं चित्र दिसत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. अशात राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 
 
सध्या 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र पुढे कडक निर्बंधांची मर्यादा वाढवली जाण्याची शक्यता विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. लॉकडाउन १०० टक्के करा लोकं अशी मागणी करत आहे. यावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात येतील तसंच कडक लॉकडाऊनबाबत अजून दोन दिवसात मुख्यमंत्री निर्णय घेतील असे संकेत त्यांनी दिले.
 
ते म्हणाले की करोनाच्या दुसऱ्या लाटेनं अंदाज चुकवला कारण ही लाट असेल असे वाटत असताना लाट तीव्र निघाली. केंद्र सरकारकडून मदत पुर्नवसनाचे 1600 कोटी येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले.
 
दिल्लीत कडक लॉकडाउन जाहीर केला गेला असून त्याची माहिती घेत असल्याचे ते म्हणाले. लॉकडाउन कसा आहे, त्यांची नियमावली काय यावर चर्चा करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रातही ही कदाचित लॉकडाऊन नियमावलीत काही बदल करण्यात येईल कारण सध्या लागू केलेल्या संचारबंदीचा हवा तितका फायदा होताना दिसत नाही, असेही वडेट्टीवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती