याप्रकरणी विवाहितेचे वडील विठ्ठल रामराव कासार (व 73, रा. लक्ष्मी कॉलनी, एकता रोड, लातूर) यांच्या फिर्यादीवरून जीवराज अनंतनाथ खोबरे (रा. वर्धमान हाइट्स, भवानी पेठ) यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. रत्नप्रभा जीवराज खोबरे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
फिर्यादीची मुलगी रत्नप्रभा हिचा विवाह 1996 मध्ये जीवराज याच्याबरोबर झाला होता. रत्नप्रभा हिचा पती जीवराज तिला सतत मानसिक त्रास देऊन शिवीगाळ, दमदाटी करीत असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करून जाचहाट करीत असे. पतीच्या त्रासाला कंटाळून रत्नप्रभा हिने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तपास सहायक पोलीस निरीक्षक मोरे हे करीत आहेत.