राज्यातल्या 'या' सहा नेत्यांशी सोनिया गांधी चर्चा करणार

सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (16:31 IST)
राज्यातील सत्तास्थापनेच्या तिढ्यावर मार्ग काढण्यासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत जोरात चर्चा सुरू आहेत. काँग्रेस कार्यकारी समितीची सकाळी बैठक झाली. त्या बैठकीत राज्यातील काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांशी बोलून निर्णय घेण्याची भूमिका घेण्यात आली. आता चार वाजता काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांसोबत सोनिया गांधी चर्चा करणार आहेत. सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार यांच्यासह सहा नेत्यांशी सोनिया गांधी चर्चा करणार आहेत. 
 
याआधी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण दिल्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेनं ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून, केंद्रात मंत्री असलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवला आहे. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली असून, काँग्रेस चार वाजता आपला निर्णय घेणार आहे. तर काँग्रेसनं निर्णय घेतल्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती