सत्तेतील वाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेलाच नव्हता – मुख्यमंत्री

शनिवार, 9 नोव्हेंबर 2019 (09:37 IST)
अडीच-अडीच वर्षे हा फॉर्म्युला ठरलेलाच नाही, हे मी आजही सांगतो आहे. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर आमची बोलणी फिस्कटली होती. त्यानंतरच्या माझ्यासमोरच्या एकाही चर्चेत हा विषय झाला नाही, असे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा स्पष्ट करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
राज्यपालांना राजीनामा दिल्यानंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात जर विषय झालेला असेल तर मला माहित नव्हते. मी तसे अमित शाह आणि नितीन गडकरी यांना विचारले. मात्र त्यांनीही असे काहीही ठरलेले नसल्याचेच सांगितले. या संदर्भातले समज-गैरसमज चर्चेने सोडवता आले असते. मात्र शिवसेनेने आमच्याशी चर्चाच केली नाही. मित्रपक्षाशी चर्चा करण्याऐवजी ते काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा केली. ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांच्याशी शिवसेनेने चर्चा केली. मात्र त्यांना आमच्याशी चर्चा करावीशी वाटली नाही असेही फडणवीस यांनी नमूद केले. निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेतच त्यांनी स्पष्ट केले की सरकार स्थापनेचे सगळे मार्ग खुले आहेत. लोकांनी महायुतीला मतदान केलं होते. त्यामुळे हे वक्तव्य आमच्यासाठी धक्काच होता, असे फडणवीस म्हणाले.
 
महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी गेली पाच वर्षे दिली त्याबद्दल मी महाराष्ट्रच्या जनतेचे आभार मानतो असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. पारदर्शी आणि प्रामाणिक सरकार आम्ही चालवले. महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम आम्ही केले. महाराष्ट्रासमोर आलेल्या विविध संकटांचा सामना अत्यंत समर्थपणे केल्याचे फडणवीस म्हणाले. चार वर्षे दुष्काळाची तर हे वर्ष अतिवृष्टीचे ठरले. तरीही शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे काम राज्य सरकारने केले, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. गेली पाच वर्षे उद्धव ठाकरे यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. मी स्वतः उद्धव ठाकरेंना फोन केले पण त्यांनी ते उचलले नाही. चर्चेची दारे आमच्याकडूून खुली होती.
 
भाजपासोबत चर्चाच करायची नाही हे धोरण शिवसेनेचे आहे आमचे नाही असंही फडणवीस यांनी म्हटले आहे.
काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी वक्तव्य करत आहेत. भाजपा आमदार फोडण्याचे करत आहेत असाही आरोप केला जातो आहे. माझे त्यांना खुले आव्हान आहे की तुम्ही पुरावे द्या नाहीतर माफी मागा. सरकार स्थापन करताना आम्ही फोडाफोडीचे राजकारण करणार नाही हे आश्वासन देतो. येत्या काळात भाजपाचेच सरकार येईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती