सोलापूर : शेकडो वर्षानंतर आयोध्या मध्ये प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्या मूर्तीसाठी सोलापूरकरांनी हाताने विणलेले वस्त्र प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला घालण्यात येणार आहे. हे आपणा सर्वांसाठी भाग्याचे लक्षण आहे. त्यामुळे सोलापूरकरांनी विवेकानंद केंद्राच्या धागा विणूया श्रीरामासाठी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन ज्येष्ठ निरूपणकार विवेक घळसासी यांनी केले. या उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी, वालचंद शिक्षण समूहाचे प्रमुख डॉ. रणजीत गांधी, आमदार सुभाष देशमुख, उद्योजक व केंद्राचे नगर संचालक दीपक पाटील, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष राजू राठी, सोलापूर जिल्हा यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. शोभाताई शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापुरातून हाताने विणले जाणारे वस्त्र प्रभू रामचंद्राला अर्पण होणार आहेत. या उपक्रमात तयार झालेले वस्त्र प्रभू श्री रामांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सदर उपक्रमास अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे कोशाध्यक्ष स्वामी श्री गोविंद देव गिरी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.