सोलापूर : बायकोनेच दाखल केला नवऱ्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा,नवऱ्याला अटक

बुधवार, 3 जानेवारी 2024 (09:24 IST)
सोलापूर : केवळ मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून जातीवाचक शिवीगाळ, मारहाण करून हीन वागणूक दिली म्हणून सवर्ण जातीच्या व्यक्तीविरूद्ध पीडित मागासवर्गीय व्यक्तीकडून ॲट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद दाखल होण्याचे प्रकार नवीन नाहीत. परंतु एका महिलेने आपल्याच नवऱ्यावर ॲट्रॉसिटी कायद्याखाली फिर्याद नोंदविण्याचा आनोखा प्रकार पंढरपुरात घडला आहे. न्यायालयीन इतिहासात बायकोकडून स्वतःच्या नवऱ्यावर ॲट्रॉसिटी दाखल करण्याची ही पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे.
 
आंतरजातीय विवाह केलेल्या संबंधित नवरा-बायकोमध्ये बेबनाव झाल्यानंतर त्याचे लोन चक्क ॲट्रॉसिटी कायद्याखाली नवऱ्याविरूध्द फिर्याद नोंदवून त्याच्या अटकेपर्यंत पोहोचले आहे. या अनोख्या खटल्याची माहिती अशी की फिर्यादी आणि आरोपी यांचा प्रेम विवाह झाला होता. फिर्यादी दलित समाजातील तर आरोपी सवर्ण समाजातील असल्याची माहिती आहे. वैवाहिक आयुष्यात त्यांच्या पोटी दोन मुलीही जन्माला आल्या.
 
नवऱ्याला अटक
अलिकडे काही दिवसांपासून नवऱ्याकडून आपणास जातीवरून अपमानास्पद आणि हीन वागणूक दिली जाते, नवऱ्याने आपल्या इच्छेविरूद्ध लैंगिक अत्याचारही केला, अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात पीडित बायकोने नोंदविली. त्यानुसार नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटीसह भारतीय दंड संविधान कलमान्वये गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी नवऱ्यास अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली.
 
गुन्हा नोंद होऊ शकत नाही, आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद
आरोपीने पंढरपूर न्यायालयात ज्येष्ठ फौजदारी विधीज्ञ धनंजय माने यांच्यामार्फत जामीन अर्ज दाखल केला आहे. लग्न झाल्यानंतर बायको नवऱ्याच्या जातीची झाली आहे, त्यामुळे ॲट्रॉसिटी कायद्याने नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने, ॲड. जयदीप माने ,ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड वैभव सुतार हे काम पाहत आहेत. नवर्‍याविरुद्ध बायकोने ॲट्रॉसिटी कायद्याखाली खटला दाखल करण्याची न्यायालयीन इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे बोलले जाते.

Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती