सोलापुरात कांद्याची उच्चांकी आवक; दर कोसळले

मंगळवार, 12 डिसेंबर 2023 (08:37 IST)
सोलापूर: कांद्यासाठी प्रसिध्द असलेल्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीमध्ये अलिकडे कांद्याची वाढती आवक आणि दर घसरणीसह लिलाव रद्द होण्याचे प्रकार घडत असताना सोमवारी उच्चांकी म्हणजे एक लाख ३० हजार क्विंटलपेक्षा जास्त कांदा दाखल झाला. त्यामुळे प्रतिक्विंटल सुमारे दीड ते दोन हजार रूपयांपर्यंत दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी आले.
 
लिलावातून कांद्याचे दर पार घसरले. मंगळवारी पुन्हा कांदा लिलाव बंद राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांची अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या गुरूवारी एकाच दिवशी ८६ हजार ८०१ क्विंटल कांदा दाखल झाला असता दर सरासरी पाचशे ते एक हजार रूपयांपर्यंत कोसळले होते. त्यातच दुस-या दिवशी, शुक्रवारी कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे कांद्याच्या आवकमध्ये आणखी वाढ होत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी लादल्यामुळे त्याविरोधात राज्यात कांदा बाजारासाठी प्रसिध्द असलेल्या जिल्ह्यांमध्ये कांदा व्यापाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील कांदा सोलापुरात मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. त्याचा भार कृषिउत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनावर वाढत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती