राज्याच्या मुख्य सचिवपदी देबाशिष चक्रवर्ती; सीताराम कुंटेंची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती

बुधवार, 1 डिसेंबर 2021 (09:07 IST)
राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा कार्यकाळ संपला आहे. कुंटे यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्राकडे पाठवला होता. मात्र, केंद्रानं हा प्रस्ताव स्वीकारला नाही. त्यामुळे सीताराम कुंटे राज्याच्या मुख्य सचिव पदावरुन निवृत्त झाले. कुंटे यांच्या जागी आता नियोजन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी राज्याच्या मुख्य सचिवपदाचा पदभार स्वीकारला आहे.
 
सीताराम कुंटे हे १९८५ च्या महाराष्ट्र बॅचचे अधिकारी आहेत. कुंटे हे मार्च २०२१ पासून राज्याच्या मुख्य सचिवपदी होते. कोरोना प्रादुर्भावाच्या काळात त्यांनी चांगलं काम केलं. तसंच ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी मानले जात होते. तसंच कुंटे यांची काम करण्याची पद्धत आणि सरकारमधील मंत्र्यांसोबतचे चांगले संबंध त्यामुळे त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. मात्र, केंद्र सरकारकडून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही.
 
दरम्यान,मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले कुंटे यांचा प्रशासनातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सचिवालयात प्रधान सल्लागार या पदावर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील निर्देश आज दिले आहेत.
 
देबाशिष चक्रवर्ती हे १९८६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. चक्रवर्ती यांच्या नियुक्तीबाबत १ महिन्यापूर्वीच प्रस्ताव देण्यात आला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. चक्रवर्ती यांना ३ महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे. ते फेब्रुवारी २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती