जोखमीच्या देशातून आलेले सहा प्रवासी करोनाबाधित

बुधवार, 1 डिसेंबर 2021 (08:38 IST)
राज्यात दक्षिण अफ्रिकेसह इतर जोखमीच्या देशातून आलेले सहा प्रवासी करोनाबाधित आढळलेल आहेत. कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर मनपा आणि पुणे या भागात अफ्रिका आणि इतर जोखीमच्या देशातून आलेला प्रत्येकी एक प्रवासी करोनाबाधित आढळला असून, पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीत नायजेरियातून आलेले दोन जण करोनाबाधित आढळले आहेत. या प्रवाशांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.
 
केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. युरोप आणि ज्या देशांमध्ये ओमायक्रॉन आढळून आला आहे, असे ११ देशांमधून जे प्रवासी भारतात येत आहेत त्या प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येत असून जे प्रवासी यामध्ये बाधित आढळतील त्यांचे नमुने जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्यात येणार आहेत. जे प्रवासी बाधित आढळणार नाहीत त्यांचेही विलगीकरण केले जाणार आहे. सात दिवसानंतर पुन्हा आरटीपीसआर चाचणी केली जाईल, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे.
 
कल्याण डोंबिवली, मुंबई महानगरपालिका, मीरा भाईंदर मनपा आणि पुणे येथे आढळलेल्या बाधित प्रवाशांच्या संपर्कातील किंवा निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. याचबरोबर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात नायजेरियातून आलेले दोन प्रवासी कोविडबाधित आले असून त्यांचेही नमुने एन आय व्ही पुणे येथे जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हे सर्व प्रवासी करोनाबाधित असले तरी लक्षणेविरहित अथवा सौम्य लक्षणे असणारे आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती