महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाच्या अनेक सदस्यांनी राजीनामा दिलेला असला तरी आपण राजीनामा देणार नसल्याचं सदानंद मोरेंनी म्हटलं आहे. मंडळाकडून पुरस्कार देण्यासाठी तीन सदस्यांची समिती तयार करण्यात आली होती. या समितीने लेखिका अनघा लेले यांना पुरस्कार देण्याची शिफारस केली. त्यानंतर समितीतील सदस्य नरेंद्र पाठक या परिक्षकांनी या पुरस्काराला विरोध करायचं ठरवलं. या विरोधामुळेच राज्य सरकारने हा पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेतला असं मोरे म्हणाले. राज्य सरकारला पुरस्कार रद्द करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. तसेच आपण सरकारविरोधात बोलणार नाही असं मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.
सदानंद मोरे यांनी म्हटलं आहे की, गेले 60 वर्ष मी भाषा साहित्यात सहभागी आहे. अनेक प्रमाणात लिखाण केलं आणि काम केलं आहे. महाराष्ट्र शासनाने मला अनेक समित्यांवर सभासद म्हणून घेतलं. त्याची सर्व कार्यपद्धती मला माहिती आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्या काळात माझी नेमणूक झाली. तसेच उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मला परत घेतलं. त्यामुळे हे पद पक्ष विरहित आहे. मी आता तिसऱ्या सरकारमध्ये काम करत आहे असंही मोरे म्हणाले.