स्वामी समर्थ भक्तांची फसवणूक; असा घातला लाखोंना गंडा, अक्कलकोट मंदिर ट्रस्ट म्हणाले…
बुधवार, 14 डिसेंबर 2022 (14:43 IST)
सोलापूर – अक्कलकोटला दर्शनासाठी जाणाऱ्या स्वामी समर्थ भक्तांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे. ऑनलाईन बुकिंगच्या नावाखाली भक्तांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मंदिर प्रशासनानेच पोलिसांकडे तक्रार केली असून त्याचा आता तपास सुरू झाला आहे.
श्री स्वामी समर्थ महाराजांचे स्थान म्हणून अक्कलकोट प्रसिद्ध आहे. अक्कलकोट शहर सोलापूरपासून ३८ कि मी अंतरावर वसलेले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे अवतार मानले जाते. श्री स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून पुजली जाते. दर वर्षी राज्यातून व पर राज्यातून मोठ्या संख्येने भक्त गण नित्य नेमाने भेट देतात. स्वामी समर्थ मंदिर हे एका वडाच्या झाडाच्या भोवती बांधले आहे. अक्कलकोट भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोटला समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आज हि येथे आहेत, अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक अक्कलकोटला येथे असतात.
मागील काही महिन्यांपासून तर स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. याचाच फायदा सायबर गुन्हेगारांनी घेतला. मागील काही दिवसात या सायबर गुन्हेगारांनी अनेक स्वामी भक्तांना फसवल्याची माहिती आहे. अक्कलकोटला आल्यानंतर राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी अनेक जण मंदिर आणि अन्नछत्र मंडळाच्या भक्त निवासाचा पर्याय निवडतात. दुसऱ्या जिल्ह्यातून येणारे भाविक इंटरनेटचा वापर करुन भक्त निवास बद्दल माहिती सर्च करीत असतात.
गेल्या काही वर्षांमध्ये अनेक गोष्टी ऑनलाइन झाल्यामुळे सायबर काइमच्या गुन्ह्यांमध्येही वाढ झाली आहे. या ऑनलाईनचा गैरफायदा या सायबर गुन्हेगारांनी घेतला. याचा फटका स्वामी समर्थ भक्तांनाही बसला आहे. कारण भक्त निवासाच्या नावाने खोटी माहिती आणि फोन नंबर ऑनलाईन संकेतस्थळावर दिली. या खोट्या संकेतस्थळावर वटवृक्ष स्वामी महाराज भक्त निवासाचे फोटो आणि इतर कुठल्या तरी हॉटेल्सचे फोटो लावून लोकांना आकर्षित केले. या सोबत दिलेल्या मोबाईल नंबरवर भाविक ज्यावेळी बुकिंगसाठी संपर्क करायचे त्यावेळी त्यांना आधार कार्ड मागितले जायचे. सोबतच आनामत रक्कम म्हणून पैसे देखील पाठवयाला सांगितले जायचे. अचानक गैरसोय होऊ नये म्हणून अनेक भाविकांनी देखील सुमारे एक ते दिड रुपये या नंबरवर पाठवले.
ऑनलाईन माहितीद्वारे भक्त निवास बुकिंग झाल्याचे समजून ज्यावेळी भाविक अक्कलकोटला पोहोचायचे त्यावेळी त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात यायचे. सुमारे २० ते २५ भाविकांनी अशा पद्धतीने फसवणूक झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाला कळवली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने देखील यासंदर्भात लोकांकडून माहिती घेऊन अक्कलकोट पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अक्कलकोट पोलिसांनी ही तक्रार सायबर पोलिसांकडे वर्ग केल्याची माहिती आहे. मात्र फसवणूक झालेल्या भाविकांना ऐनवेळी पर्यायी व्यवस्था शोधण्याचा मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला.
अक्कलकोटला येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी यासाठी वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर समितीतर्फे भक्त निवास सुरु करण्यात आले. कोणीही गैरफायदा घेऊ नये आणि सर्वसामान्य भाविकांना सोय व्हावी यासाठी प्रशासनाने फोनद्वारे किंवा ऑनलाईन बुकिंग सुविधा सुरु केलेली नाही. जे भाविक आधी येतील त्यांना आधी रुम मिळेल हेच तत्व अनेक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे भाविकांना सायबर गुन्हेगारांच्या भूलथापास बळी पडू नये असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले.