आणखीन दोन लेखकांनी तडकाफडकी दिले राजीनामे

बुधवार, 14 डिसेंबर 2022 (20:20 IST)
social media
लेखक आणि साहित्यिक विनोद शिरसाट आणि लक्ष्मीकांत देशमुख यांनी राजीनामा देत लेखिका अनघा लेले यांना जाहीर झालेला पुरस्कार रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा निषेध केला आहे. लेखक विनोद शिरसाट यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिवांना पत्र लिहून मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यात त्यांनी म्हटलं आहे की, मी सातत्यानं नक्षलवादी चळवळ विरोधात भूमिका घेतलेली आहे.
 
ज्या पद्धतीनं पुरस्कार रद्द करण्यात आला, ती कृती अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांच्या विरोधात आहे. त्यामुळं मी मंडळाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं विनोद शिरसाट यांनी राजीनाम्यात म्हटलं आहे. तर लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
 
महाराष्ट्र राज्य शासनातर्फे देण्यात येणारे उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले होते. वेगवेगळ्या गटांमध्ये हबीब भंडारे, रमजान मुल्ला, शरद बाविस्कर, दीपा देशमुख यांच्यासह 33 लेखकांची निवड या पुरस्कारांसाठी करण्यात आली होती. त्यातच प्रौढ वाङ्मय (अनुवाद) प्रकारातील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार कोबाड गांधी लिखित ‘फ्रॅक्चर्ड फ्रीडम तुरुंगातील आठवणी व चिंतन’ या पुस्तकाला देण्यात आला होता. अनघा लेलेंनी मराठी भाषेत या पुस्तकाचा अनुवाद केला आहे. मात्र त्याला साहित्य क्षेत्रातून आक्षेप घेण्यात आला.
 
Edited by-Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा