शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर सेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रीया आली आहे. उद्धव यांनी निरोपाचे अत्यंत भावनिक भाषण केले. राज्यभरातून उद्धव यांना मोठी सहानुभूती मिळत आहे. अशा पार्श्वभूमीवर शिंदे हे काय प्रतिक्रीया देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी आता काही बाबी स्पष्ट केल्या आहेत.
शिंदे यांनी त्यांच्या पहिल्या प्रतिक्रीयेत म्हटले आहे की, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, शिंदे यांनी सत्ता स्थापनेबाबत प्रथमच मोठी माहिती दिली आहे.
शिंदे म्हणाले की, भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी सांगितले आहे.