गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या विविध आरोपांप्रकरणी झालेल्या सुनावणीत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना उच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा १०० कोटींची मागणी तुमच्यासमोर केली होती का ? असा सवालही या सुनावणीत न्यायालयाने विचारला. यावेळी न्यायालयाने हे केवळ ऐकीव गोष्टींवर केलेले आरोप भासत असल्याचेही म्हटले आहे. तुमच्या ऑफिसर्सनी तुम्हाला तोंडी सांगितले, मात्र तुमच्याकडे याचे काहीही पुरावे नाहीत, असेही कोर्टाने म्हटले आहे. मुंबई पोलीस आयुक्त या नात्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करणे ही तुमचीच जबाबदारी होती. तुम्ही तुमच्या कर्तव्यात कमी पडलात, तुमचे वरीष्ठ जरी कायदा मोडत असतील तरी, त्याची तक्रार देऊन गुन्हा दाखल करणे ही तुमचीच जबाबदारी आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी या याचिकेत पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना बार आणि रेस्टॉरंट्समधून १०० कोटी रुपये जमा करण्यास देशमुख यांनी सांगितले होते, असा आरोप केला आहे. याचप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी हे खडे बोल न्यायालयाने सुनावले. पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली व पदस्थापनाशी संबंधित मोठा भ्रष्टाचार देशमुख करीत असल्याचा सिंग यांचा आरोप आहे.