पत्नी करोनाने गेली, पतीनेही गळफास घेत स्वत:चं आयुष्यच संपविलं!

बुधवार, 31 मार्च 2021 (14:25 IST)
करोनाने सात-आठ महिन्यांपूर्वी रोजगार हिरावला. त्यातून कसंबसं सावरत कुठं तोच या करोनाने पत्नी गेली. मग खचून जाऊन त्यानं गळफास घेत स्वत:चं आयुष्यच संपविलं. करोनामुळं अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. तसेच, जवळच्या व्यक्तीही दुरावल्या गेल्यानं समाजात आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत. प्रत्येक घटनेतली पात्रे, दु:ख, वेदना वेगळ्या असल्या तरी आर्थिक विवंचनेची किनार सारखीच आहे. 
 
श्रमिकनगरमध्ये राहणाऱ्या संगीता पवार (वय ४५) यांना सोमवारी रात्री श्वास घेण्यास त्रास झाला. वेळेवर रुग्णालयात बेड उपलब्ध न झाल्यानं त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचा मुलगा बाळा याने वडील रवींद्र पवार (वय ५३) यांना फोन करून आईच्या मृत्यूची माहिती दिली. पुन्हा फोन केले असता, रवींद्र यांनी प्रतिसाद दिला नाही म्हणून त्याने शेजाऱ्यांना कळवलं. त्यांनीही आवाज देऊन बघितला. शेवटी खिडकी उघडून आत बघितले असता, रवींद्र यांनी फॅनला गळफास घेतल्याचं दिसून आलं. पत्नीचीच साडी घेऊन त्यांनी स्वत:ला संपवलं. पवार सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होते. मात्र, काही महिन्यांपासून त्यांच्या हाताला काम नव्हते. ते मूळचे येसगाव (ता. मालेगाव) येथील आहेत. करोनानं त्यांचा संसारच उद्धवस्त केला. आता मुलगा बाळा (वय२२) व मुलगी काजल (वय २४) दोघेही पोरके आले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राधाकृष्णनगर भागात गांगुर्डे नामक स्कूल व्हॅन चालकाने आर्थिक चणचणीमुळे गळफास घेतला होता.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती