कोकणाला पुढच्या दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट

सोमवार, 10 जून 2024 (20:41 IST)
नैऋत्य मान्सून आता नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
मान्सूनची उत्तरेकडची सीमा डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, निझामाबाद, सुकमा, मलकानगिरी, विझिनाग्राममधून आणि बंगालच्या इस्लामपूरमधून जाते.पुढच्या दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात आणखी आगेकूच करेल आणि गुजरातमध्ये दाखल होईल अशी अपेक्षा आहे. 9 आणि 10 जूनला मुंबई परिसरात सर्वदूर पाऊस झाला. दहा तारखेला सकाळच्या आकडेवारीनुसार पनवेलमध्ये 24 तासांत 147 मिलीमीटर पाऊस झाला.
 
मुंबई शहरात, विशेषतः दक्षिण मुंबईत काही ठिकाणी 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली.
 
पुढील दोन दिवसांत कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढेल अशी अपेक्षा आहे.
पुढच्या चोवीस तासांत कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (50-60 किमी प्रतितास वेग) आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
 
मुंबई शहरात साधारणपणे ढगाळ आकाश आणि शहर आणि उपनगरात गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Edited By- Priya Dixit

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती