सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणारे मग तो पासपोर्ट घोटाळा, असो अथवा ड्रग्स विकणारी टोळी, रिक्षा चालकांची दादागिरी उघड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना काल मुंबई पोलिसांनी दोन वर्षे तडीपारची नोटीस बजावली आहे. नांदगावकर यांनी त्यासाठी कायदा हातात घेतला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नांदगावकरांनी पासपोर्ट घोटाळ्यामुळे अनेकांची झालेली फसवणूक उघड केली होती. नांदगावकर यांची तडीपारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या कारवाईला मनसेने प्रखर विरोध केला आहे.नांदगावकर फेसबुक लाईव्ह वरून नेहमीच सर्वसामान्यांचे प्रश्न जनते समोर आणत होते नांदगावकर यांनी या नोटिसीला उत्तर देताना संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. नेमकी माझी कोणाला भीती वाटत आहे? माझी भीती सर्वसामान्य नागरिकांना वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुंबई पोलीस कामाला लागले आहेत. मी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र माझा, त्यामुळे मला कुठे तडीपारकरणार ? असा हि सवाल त्यांनी विचारला आहे. मी कुठे चुकलो हे जनतेनेच सांगावे, पण यापुढे देखील आपण अन्यायाच्या विरोधात आवाज उठवतच राहणार असल्याचे नांदगावकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.