राजकारणच नव्हे, महाराष्ट्राचा स्वभावही उत्तरेसारखा होतोय - सुहास पळशीकर

सोमवार, 4 डिसेंबर 2023 (08:24 IST)
BBC
भाजपनं चार पैकी तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यामुळं आता अपेक्षेप्रमाणं 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातील चर्चांना सुरुवात झाली आहे.
 
त्याचबरोबर महाराष्ट्रातील गेल्या काही वर्षांतील स्थिती पाहता देशातील चार महत्त्वांच्या राज्यातील या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार याचीही उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
 
गेल्या काही निवडणुकांमध्ये महाराष्ट्रानं उत्तरेतील राज्यांसारखाच कल दाखवला आहे. पण राजकारणचं काय तर आता महाराष्ट्राचा स्वभावही उत्तरेसारखा होत चालल्याचं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांनी मांडलं आहे.
 
या संपूर्ण निकालाबाबत बीबीसी मराठीनं सुहास पळशीकर यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस, इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि राज्यातील महायुती याबाबतही महत्त्वाची मतं मांडली.
 
महाराष्ट्राचा स्वभाव बदलतोय?
या निकालांचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम याबाबत बोलताना सुहास पळशीकर यांनी महत्त्वाच्या मुद्द्याकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
 
महाराष्ट्र्राच्या राजकारणाचा विचार करता, गेल्या काही निवडणुकांमध्ये उत्तरेच्या राजकारणासारखाच कल महाराष्ट्रात दिसला. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वीसारखं वेगळेपण राहिलेलं दिसत नाही. पण आता महारष्ट्राचा स्वभावच उत्तरेसारखा बनतोय आणि आपण दक्षिणेपासून बाजुला होतोय, याची चिंता वाटत असल्याचं ते म्हणाले.
 
"महाराष्ट्र उत्तरेसारखा होत असल्याचं सध्या दिसत आहे. इथल्या राजकारणात पूर्वीसारखं वेगळेपण राहिलेलं नाही. त्यामुळं दक्षिण-उत्तर अशी विभागणी केली तर, उत्तरेच्या हिंदुंच्या अधिकाधिक कल्पना आपल्याकडे दिसत आहेत. उत्तरेतील धार्मिक आक्रमकपणा महाराष्ट्रात जास्त येऊ लागला आहे. त्यामुळं महाराष्ट्र उत्तरेसारखा व्हायला लागला आहे," असं पळशीकर म्हणाले.
 
'मविआपेक्षा महायुती अडचणीत'
विधानसभेची गणितं वेगळी असतात, त्यामुळं या निकालांचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होणार नाही. पण काही गोष्टींवर त्याचा परिणाम होईल, असं पळशीकर म्हणाले.
 
महाराष्ट्रात लोकसभेत महाविकास आघाडीला जागावाटप अवघड जाणार नाही. उलट महायुतीला अवघड जाईल, कारण भाजपला तेव्हा दोन पक्षांना जागा द्याव्या लागतील, असं पळशीकर म्हणाले.
 
त्याचवेळी, "शिंदे आणि अजित पवारांना सध्या बरं वाटत असलं तरी, या पट्ट्यात आपला बोलबाला आहे हे भाजपला कळल्यानं भाजप त्यांना आम्ही सांगू तसं वागा असं म्हणतील. कारण मुळात भाजपचं राजकारण प्रादेशिक पक्षांना दुबळं करण्याचं आहे," असंही ते म्हणाले.
 
तसंच महाविकास आघाडीतील पक्षांसमोर एकमेकांची मतं ट्रान्सफर कशी करायची हे शिकण्याचं मोठं आव्हान असेल, असंही त्यांनी सांगितलं.
 
'यशात मोदींचा वाटा मोठा'
भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यावर मिळवलेलं हे यश म्हणजे त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या टप्प्याच्या दिशेनं वाटचाल करण्याची सुरुवात असल्याचं पळशीकर म्हणाले.
 
सध्याचं चित्र पाहता हा विजय मिळवण्यात मोदींचाच महत्त्वाचा वाटा होता. कारण संपूर्ण निवडणूक त्यांना केंद्रस्थानी ठेवून लढल्याचंही ते म्हणाले.
 
"मोदींबद्दल उत्तर पट्ट्यातील जनतेचा विश्वास, आपलेपणा हा गेल्या 10 वर्षात कायम राहिल्यानं त्यांना यश मिळवणं सोपं गेलं. पक्ष संघटना, प्रचार यंत्रणा हे असलं तरी मोदींचा कनेक्ट हा मुख्य मुद्दा होता. गेल्या वेळी काँग्रेसनं लढा तरी दिला होता. पण यावेळी तेही झालं नाही. केंद्र सरकारबद्दल या तीन राज्यांत असलेलं अनुकुल मत पाहता याचं श्रेय केंद्र आणि मोदींना द्यावं लागेल," असं पळशीकर म्हणाले.
 
'बीआरएसचा डाव उधळला'
काँग्रेसनं तेलंगणा जिंकलं असलं तरी तो पूर्वीचा त्यांचाच बालेकिल्ला होता. त्यामुळं त्यांनी तो परत मिळवला एवढंत आहे. त्यात केसीआर यांच्या विरोधातील लाटेचा त्यांना फटका बसला असंही पळशीकर म्हणाले.
 
पण तसं असलं तरी छत्तीसगड गेलेलं असताना तेलंगणा राज्य मिळालं. त्यामुळं एक जाऊन दुसरं राज्य मिळाल्यानं काँग्रेससाठी हे यश मोठं ठरतं असं ते म्हणाले.
 
"पण या पराभवामुळं केसीआर यांचा महाराष्ट्रात आणि प्रामुख्यानं देशातील राजकारणात प्रेश करण्याचा डाव उधळला गेला. त्यांच्या या प्रयत्नाला आता फार कोणी गांभीर्याने घेणार नाही."
 
काँग्रेस, भारत जोडो आणि आव्हाने
या निवडणुकांच्या निकालानं काँग्रेससमोर अनेक आव्हानं उभी राहणार आहेत. गेहलोत आणि कमलनाथ याचं वय पाहता तिथं नवं नेतृत्व काँग्रेसला उभं करावं लागणार आहे. कारण या नेत्यांकडून आता काँग्रेसला फार काही मिळणार नाही. त्यामुळं हे त्यांच्यासमोरचं मोठं आव्हान असेल असंही पळशीकर म्हणाले.
 
भारत जोडोनंतर राहुल गांधी आणि काँग्रेसनंही काहीच केलं नाही. काँग्रेसनं भारत जोडोनंतर लगेचच त्याचीची पुनरावृत्ती करणारी यात्रा काढायला हवी होती. त्यात राहुल गांधीच हवे होते असं नाही. पण भूमिका घेण्याचं सातत्य ठेवण्यात काँग्रेसला अपयश आलं. त्यामुळं आतातरी काँग्रेसला पुन्हा असे प्रयत्न करून त्यात कार्यकर्त्यांना सहभागी करून घ्यावं लागेल," असं मत पळशीकरांनी मांडलं.
 
दुसरीकडं इंडिया आघाडीतील पक्षंही आता काँग्रेसला मध्यवर्ती भूमिकेत ठेवायचं की नाही यावर विचार करतील. कारण ते काँग्रेसला आता तुम्ही मोठे पक्ष नाही असं म्हणून शकतील, हाही मुद्दा आगामी राजकारणाच्या दृष्टीनं महत्त्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
"लोकसभा निवडणुकीला अजून सहा महिन्यांचा काळ आहे. त्या दरम्यान काहीही राजकारण घडू शकतं. त्यामुळं याला सेमिफायनल म्हणता येणार नाही. पण तीन राज्यांतील यशामुळं वातवरण त्यांच्या बाजुनं नक्कीच झुकलेलं असेल. परिणामी तिसरी निवडणूक जिंकण्याच्या संधीकडे भाजपची वाटचाल सुरू झाली आहे."
 
देशातील INDIA आघाडीनं टेक ऑफलाच शांत बसायंच ठरवलं, त्यामुळं त्यांना सतत लोकांमध्ये जावं लागेल. फक्त निवडणुकीच्या वेळीच लोकांमध्ये जाऊन चालत नाही, हा धडा इंडिया आघाडीने घ्यावा, असंही पळशीकर म्हणाले.
 
(ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्याशी बीबीसी मराठीसाठी कार्यरत असणाऱ्या प्राची कुलकर्णी यांनी बातचित केली.)

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती