विधानसभा निवडणूक निकाल : 'आता महाराष्ट्रात भाजपला एकनाथ शिंदे-अजित पवारांची गरज नाही'

रविवार, 3 डिसेंबर 2023 (21:51 IST)
"महाराष्ट्राचा विचार करता भाजपला शिंदे किंवा अजित पवारांची गरज नाही. तर त्यांना भाजपची गरज आहे. कारण भाजपकडं मोदी आणि यंत्रणा मजबूत आहे," असं स्पष्ट मत 'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केलं आहे.
 
देशात आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर झालेल्या चार राज्यांतील या निवडणुकीकडं लिटमस टेस्ट म्हणून पाहण्यात येत होतं. त्यामुळं या निकालाकडं सर्वांचच लक्ष लागलं होतं.
 
चार राज्यांच्या निवडणुकांचे निकालाचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या उत्तरेतील तिन्ही महत्त्वाच्या राज्यांत सत्ता मिळवत भाजपनं बाजी मारली, तर काँग्रेसनं तेलंगणात केसीआर यांना धोबीपछाड दिली आहे.
 
या संपूर्ण निकालाचा नेमका अर्थ काय आहे आणि भविष्यातील घडामोडी आणि राज्यातील राजकारणाच्या दृष्टीने त्याचे काय पडसाद उमटणार आहेत याचं विश्लेषण 'लोकसत्ता'चे संपादक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक गिरीश कुबेर यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना केलं आहे.
मोदी आणि भाजपवर पुन्हा शिक्कामोर्तब
या निवडणुकीच्या यशानं मोदींचा करिश्मा आहेच आणि त्याचबरोबर भाजपच्या स्थानिक नेतृत्वानंही कंबर कसून काम केल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिल्यानं गिरीश कुबेर यांनी सांगितलं.
 
भाजपच्या यशाचं विश्लेषण करताना कुबेर म्हणाले की," इतर पक्ष सत्ताविरोधी लाटेची कारण देत असताना, भाजप मात्र धर्म आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्याला समाजकारण किंवा कल्याणकारी योजनांची फोडणी देऊ त्याचा राजकारणात वापर करतात. हेच त्यांच्या यशाचं गमक आणि कदाचित पुढच्या विजयाचंही इंगित असू शकतं."
 
वेळप्रसंगी शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजेंना पर्याय देण्याचे संकेतही भाजप देतं, त्यामुळं राजकारणातली ही लवचिकता त्यांना कामी येते, असंही कुबेर यांनी म्हटलं.
 
भाजप सतत व्यावसायिक पद्धतीनं राजकारण करतं आणि काँग्रेस मात्र भावनिक पद्धतीनं राजकारणाकडं बघत राहतं. पण आता भावनेचे दिवस गेले असून आता फक्त रोकडा व्यवहार असंच राजकारणाकडं पाहिलं जातं आणि भाजप त्यात वारंवार यशस्वी होताना दिसतं, असं मत कुबेर यांनी मांडलं.
 
2024 ची निवडणूक भाजपसाठी अधिक सोपी होणार?
या निकालांनतर संपूर्ण देशातच याच्या प्रतिक्रिया पाहायला मिळणार आहेत. प्रामुख्यानं आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर त्याचा कसा परिणाम होणार याचंही त्यांनी विश्लेषण केलं.
 
"भाजपसाठी 2024 साठीचा डाव अगदी सोपा आणि सरळ झाला आहे. या विजयामुळं त्यांच्या राज्यसभेतल्या जागा तर वाढणारच आहेत याच शंकाच नाही.
 
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे ही राज्यं काँग्रेसच्या ताब्यात होती तेव्हाही येथील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत मोदींनाच मतदान केलं होतं. मग आता तर ही राज्यंच भाजपकडं गेली आहेत, त्यामुळं त्यांच्या जागा वाढणारच आहेत."
 
सध्या उत्तर आणि दक्षिणेत दुही दिसून येते.
 
उत्तरेत भाजप तर दक्षिणेत काँग्रेसचं बस्तान पाहायला मिळतं. पण उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेतून येणाऱ्या खासदारांची संख्या फार कमी आहे.
 
त्यामुळंच 2024 ची निवडणूक भाजपसाठी अधिक सोपी असेल यात शंका नाही, असं कुबेर यांनी म्हटलं आहे.
 
'भारत जोडो'तून मतदार जोडले गेले नाही?
गिरीश कुबेर यांनी काँग्रेसच्या दृष्टीनं ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असल्याचं सांगत, त्यांनी आता मेहनत घेतली नाही तर सर्वकाही हातून निसटून जाईल अशी शक्यता व्यक्त केली आहे.
 
"सध्याचा काळ 24 तास राजकारण करण्याचा काळ आहे. राहुल-प्रियांका यांनी दोन चार सभा घेऊन चालणार नाही. अमित शहांसारखा नेता मध्य प्रदेशात ठाण मांडून बसतो. अशी कष्ट घेण्याची तयारी भाजपप्रमाणं काँग्रेसला दाखवावी लागेल.
काँग्रेसला 'भारत जोडो' यात्रेमुळं मतं पडली असं नाही. कर्नाटक आणि तेलंगणात ते अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं लढले. पण राजस्थान किंवा मध्य प्रदेशात तसं केलं नाही. नियोजन करुन विजय मिळवण्यात काँग्रेस कमी पडतंय.
 
कमलनाथ विमानातून फिरत असताना शिवराज सिंह गावागावात पायी, मोटारीनं फिरत होते. राजस्थानात गहलोत-पायलट यांच्यात मतभेद होते, त्यामुळे काँग्रेसला बदल करावा लागेल," असंही मत कुबेर यांनी व्यक्त केलं.
 
... तर INDIA आघाडीला भवितव्य नाही!
भाजप आणि मोदींच्या विरोधात देशभरातील पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडीची स्थापना केली. या निकालांनंतर त्या आघाडीचं काय होणार यावरही कुबेरांनी विश्लेषण केलं.
 
त्यांच्या मते, राजकीय पक्षांनी किमान एका ठरावीक टप्प्यापर्यंत एकत्र राहावं, तसं झालं तरच मतदार त्यांच्याकडं वळतील. काँग्रेसच्या बाबतीत कर्नाटक आणि तेलंगणात ते झालं.
 
पण ही आघाडी त्या टप्प्यापर्यंत पोहोचतच नाहीत. आपण मतदारांसमोर पर्याय उभा करू शकतो, हे आधी या आघाडीलाच वाटायला हवं. त्यानंतर मतदारांनाही ते वाटेल याचीही व्यवस्था त्यांनी केली पाहिजे, असंही ते म्हणाले.
 
"भारतात सत्ताधाऱ्यांचा कंटाळा येत नाही तोपर्यंत इतर पक्षांना स्वबळावर सत्ता मिळवता येत नाही. त्यामुळं लोकांना या सत्ताधाऱ्यांचा कंटाळा येण्याची वाट या आघाडीला करावी लागेल.
 
जसं तेलंगणामध्ये झाले. तर दुसरा पर्याय म्हणजे त्यांना स्वतःची पात्र असल्याची प्रतिमा तयार करावी लागेल. या दोनपैकी एक घडेपर्यंत या आघाडीला भवितव्य नाही," असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं.
 
एकनाथ शिंदे-अजित पवारांना दिलासा?
मध्य प्रदेशातही काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर त्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा प्रकार घडला. तरीही मध्य प्रदेशात कौल भाजपाच्याच बाजूने लागला.
 
त्यामुळे आता या निकालाचा महराष्ट्रात काय परिणाम होईल, एकनाथ शिंदे-अजित पवारांसाठी हा निकाल किती महत्त्वाचा आहे, यावरही गिरीश कुबेर यांनी भाष्य केलं.
 
सध्या विरोधी पक्षात राहण्याची कोणाचीच इच्छा दिसत नाही. त्यात जुनी प्रकरणं बाहेर निघण्याचा धाक, भीती किंवा इतर काहीही कारणं असू शकतात. पण भाजपला आणखी यश मिळालं तर हे प्रकार जास्त वाढतील, असं मत कुबेर यांनी मांडलं.
 
"महाराष्ट्राचा विचार करता भाजपला शिंदे किंवा अजित पवारांची गरज नाही. तर त्यांना भाजपची गरज आहे. कारण भाजपकडं मोदी आणि यंत्रणा मजबूत आहे.
 
पण गरज नसतानाही त्यांच्यासोबत राहावं लागणं हे भाजपचं राजकीय यश आणि विरोधकांचा पराभव आहे."
 
त्यामुळं हे चित्र असंच राहिलं तर राज्यातील विधानसभा निवडणुकीतही त्याचा फायदा होईल आणि निकाल कसा लागेल हे वेगळं सांगावं लागणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.
 
मविआसाठी धोक्याची घंटा
राज्यात पाच वर्षांपूर्वी काय झालं ते झालं. पण जनतेची स्मरणशक्ती कमी असते. मतदार त्याचा राग ते मनात धरून ठेवत नाहीत, असं मत कुबेर यांनी मांडलं.
 
"लोकांच्या मनात राग आहे, यात शंकाच नाही. त्यामुळंच राज्यात अनेक ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाहीत. पण हा राग शांत करण्याचा मार्ग भाजपकडं आहे. भाजप तो प्रयत्न करत आहे. जितक्या निवडणुका होत जातील तितका तो राग शांत होत जाईल आणि राग निवळला तर काय होतं ते मध्य प्रदेशात दिसून आलं."
 
निवडणुका आल्या की कामाला लागून काही फायदा होत नाही, त्यामुळं मविआला तोपर्यंत वाट पाहून चालणार नसल्याचंही ते म्हणाले.
 
जनतेचा कौल एकतर्फी बहुमताला?
गेल्या काही निवडणुकांमध्ये लोकांनी स्पष्ट बहुमताचे सरकार निवडले आहे. एका ठरावीक टप्प्यापर्यंत पोहोचलं तर भरघोसं मतं मिळतात हे स्पष्ट आहे. त्यामुळं विरोधकांना आपण स्पर्धेत आहोत आणि पर्याय देऊ शकतो हे दाखवावं लागणार आहे, असंही कुबेर म्हणाले.
 
"पण स्पष्ट बहुमत मिळणं हे चांगलं आहे कारण त्यामुळं घोडेबाजाराला कमी संधी मिळते. त्यामुळं जो कोणी स्पर्धेत असेल त्याला कसोशीनं प्रयत्न करत आपण आहोत हे दाखवून द्यावं लागेल आणि त्यामुळं मतं खाणाऱ्यांचं महत्त्वंही कमी होईल, हेही समोर आलं आहे," असंही गिरीश कुबेर म्हणाले.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती